पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर

मुलांनो,इतिहासाची पाने उलगडून पहात असताना त्यात आपणाला अनेक महापुरूषांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटलेला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचेही दर्शन घडते. पुरातन कालपासूनते आजपर्यंत काही स्त्रियांनी त्या त्या कालखंडावर आपल्या कर्तबगारीची मोहर उमटवलेली दिसते . पेशवाई संपतानाच्या काळात इंदूरच्या मल्हरराव होळकरांच्या सुनबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर याही आपल्या कर्तबगारीने तळपल्या. चोख राज्यकारभार, प्रसंगी हातात तलवार घेऊन लढण्याची तयारी, केलेला अपार दानधर्म, लोककल्याणाची कार्य यामुळे त्यांचे नाव हिंदुस्तानात दुमदुमले. अशा अहिल्याबाईंचे कर्तृत्व सर्वानाच दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरलेले आहे. तर मुलांनो, आपण त्याच्या कर्तृत्वाची ओळख करून घेऊ या.
The Biographya of Ahilyabai Holkar|अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र
अहिल्याबाईंचा जन्म
अहिल्याबाई जन्मल्या तो काळ फारच धामधुमीचा होता. थोरले बाजीराव हे मराठशाईचे पेशवे या नात्याने कारभार पहात होते.. त्याचवेळी इ . स. १७२५ च्या सुमारास मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील चौंडी या गावी अहिल्याबाईंचा जन्म झाला. अहिल्याबाईंचे वडिलांचे नाव माणकोजी,तर आईचे नाव सुशिला बाई होते. माणकोजी चौंडी गावचे पाटील होते. धनगर समाजातील ते एक कर्ते पुरुष होते. सात्विक वृत्तीचे धर्मपरायण गृहस्थ होते. घरातील वातावरण धार्मिक होते. अहिल्याबाईंना आणखी पाच भावंडे होती. अहिल्याबाईंचे घराणे तसे खाऊन-पिऊन सुखी होते. त्याकाळी स्त्रियांना शिक्षण घेता येत नसे. त्यामुळे अहिल्याबाई प्रत्यक्ष शाळेत गेल्या नाहीत. घरच्या सात्विक वातावरणामुळे त्या घरच्या घरीच लिहायला- वाचायला शिकल्या. अहिल्याबाईंच्या माता सुशिलाबाई या संसारदक्ष स्त्री होत्या.त्याही लिहायला- वाचायला शिकल्या होत्या. अहिल्याबाईंना त्यामुळेच घरच्या घरी शाळेत ना जाताही विद्याग्रहण करता आले. सात्विकता,धार्मिकता हे गुण अहिल्याबाईंनी आपल्या आईकडून उचलले.अहिल्याबाई मूळच्याच बुद्धिमान असल्याने चांगले- वाईट हे त्यांना चटकन ओळखता येऊ लागले चांगल्या गोष्टीकडे त्यांचे मन लगेच चांगल्या गोष्टीकडे त्यांचे मन लगेच वेधले जात असे, आई- वडिलांनी केलेल्या सुसंकारामुळे अहिल्याबाई लहानपानपासूनच सुशील, सात्विक आणि धर्मपरायण वृत्तीच्या होत गेल्या. अहिल्याबाईंचा विवाह त्या आठ वर्षाच्या असतानाच झाला. मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव यांच्याशी अहिल्याबाईंचे लग्न झाले. मल्हारराव होळकर हे कोणी साधी असामी नव्हती. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे उजवा हात असलेले मल्हारराव, मराठेशाहीतील पराक्रमी आणि नावाजलेले घराण्यात अहिल्याबाई मल्हारराव होळकरांच्या सुनबाई म्हणून दाखल झाल्या.
पदरी पडले आणि पवित्र झाले
रथाची दोन्ही चाके ताळमेळ ठेऊन फिरत असतील तर रथ वाटेने व्यवस्थित चालतो. त्यातील एक चाक अडखळत फिरू लागले, तर मात्र रथ नीट चालत नाही. संसार रथाचेही तसेच असते. पती पत्नीची एक दुसऱ्याला साथ नसेल, आचार-विचारात विसंगती असेल तर संसार रथ नीट चालत नाही. कधी कधी तर कोलमडून पडतो. मल्हाररावांचे पुत्र खंडेरावांशी अहिल्याबाईंचा विवाह झाल्यावर त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. आपले पती संसाराकडे व्यवस्थित लक्ष देणारे नाहीत हे त्या समजून चुकल्या परंतु पदरी पडले आणि पवित्र झाले. या न्यायाने फारसे मनावर न घेता त्या आपल्या संसाराला लागल्या. सासरे मल्हारराव आणि सासू गौतमाबाई याना आपली सून अहिल्याबाईंचा सुस्वभाव दिसून आला. ते अहिल्याबाईंना आपल्या मुलीप्रमाणे वागवू लागले. त्यांच्यावर माया करू लागले. वयाच्या मानाने अहिल्याबाईंना खूप समज होती. त्या आपल्या सासू सासर्यांशी प्रेमाने वागत होत्या.त्यांचा मान ठेवीत होत्या.त्यामुळे सर्वजण त्यांचे कौतुक करीत मल्हाररावांनी आपल्या पराक्रमाने,धैर्याने अखिल हिंदुस्तानात कीर्ती मिळवली होती. दरारा निर्माण केला होता. पेशव्यांनी त्यांना इंदूरची जहागिरी बहाल केली. होती. त्यांच्या सुखात कसली कमतरता नव्हती. फक्त मुलगा खंडेराव त्याच्या दुःखाचे कारण बनले होते. म्हणून मल्हारराव मनात फार दुखी,कष्टी झाले होते. अहिल्याबाईंचे पती स्वछंदी,तापट आणि उधळ्या स्वभावाचे होते. तसेच भांडखोरही होते. आपले पती कर्तव्यशून्य असले तरी अहिल्याबाई त्यांचा तिरस्कार करीत नसत. पती हा परमेश्वर असतो, असे मानून त्या पतिधर्म पाळीत होत्या. त्या विशाल अंतःकरणाच्या,सुसंस्कृत,साध्वी पतिव्रता स्त्री होत्या. सासू सासऱ्यांची मर्जी सांभाळून, ते सांगतील त्याप्रमाणे त्या ऐकत होत्या. त्यामुळे आपल्या कर्तव्यशून्य मुलाचे दुःख विसरून तेही अहिल्याबाईंना प्रेमाने वागवीत असे. आपल्या मुलाचे भवितव्य मल्हाररावांनी ओळखले होते. त्याला आपल्या जहागिरीत कसलाही रस नव्हता. बुद्धिमतेने, हुशारीने कारभार करण्याची पात्रता त्याच्या अंगी नव्हती. म्हणूनच मल्हाररावांनी अहिल्याबाईंना राजकारणाच्या तालमीत शिकवून तयार करण्याचे ठरविले.
अहिल्याबाई होळकर यांचा जीवन प्रवास
राज्यकारभाराचे धडे
मल्हारराव हळूहळू अहिल्याबाईंना राजकारणाचे,युद्धाचे शिक्षण देऊ लागले. लढाईशी संबंधित कोणत्याही गुणात त्यांनी मागे राहू नये, अशाप्रकारे ते अहिल्याबाईंची तयारी करवून घेऊ लागले. दरबारी कामकाज पद्धती, रीतिरिवाज,युद्धाचे हिशेब वगैरे अशा सर्व कामात अहिल्याबाई रस घेऊ लागल्या. त्यांचा आवाका पाहून मल्हारराव खुश झाले. मुलगा नाही झाला तरी सून राजकारणात तरबेज होईल याची खात्री पटू लागली. जहागिरीचा सर्व कारभार त्यांनी अहिल्याबाईंवर सोपवायला सुरुवात केली. राज्यकारभारातले एकूण एक बारकावे अहिल्याबाई शिकू लागल्या. मूलतःच हुशार, चाणाक्ष आणि बुद्धिमान असल्याने राज्यकारभाराचे सर्व शिक्षण अहिल्याबाईंनी मल्हारावांकडून मिळविले.मल्हरराव मोहिमेवर,युद्धभूमीवर असले कि जहागिरीचा राज्यकारभार अहिल्याबाई समर्थपणे पेलीत असत.अहिल्याबाईंचे राजकीय कौशल्य पाहून दरबारी मंडळी, सेवक अचंबित होत असत. कधी कधी तर मल्हारराव अहिल्याबाईंना प्रत्यक्ष युद्धभूमीवर नेत असत. तेथे अहिल्याबाईंचे धैर्य,वीरवृत्ती, साहस आणि धाडस पाहून मल्हाररावांना धन्यता वाटे. अहिल्याबाई तशा चौकस बुद्धीच्या होत्या. एक स्त्री म्हणून त्या मागे राहत नसत. त्यांच्या बुद्धीची झेप सुद्धा तीव्र होती. आपल्या देशाचा भूगोल, रस्ते, शहरे, गावे कशी वसली आहेत. याचीही माहिती त्यांनी करून घेतली होती.
सुखाची हिरवळ
अहिल्याबाई कशात कमी पडत नव्हत्या . राज्यकारभार, राज्याचा महसूल, अर्थव्यवस्था, न्याय या महत्वाच्या बाबींवर त्यांनी अल्पकाळात प्रभुत्व मिळविले होते. सर्व गोष्टींवर त्यांचे नियंत्रण होते. कोणत्यावेळी कशाची गरज असेल याची त्यांना पूर्ण कल्पना आली होती. ज्याची आशा अहिल्याबाईंनी सोडली होती. तेच दान आता त्यांच्या पदरात पडणार होते. लग्नांनंतर जवळजवळ बारा वर्षांनी अहिल्याबाईंना दिवस गेले होते. त्यांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागली होती. यथावकाश त्या प्रसून झाल्या. त्यांना मुलगा झाला. मुलाचे नाव ‘मालेराव ‘ असे ठेवले. आणखी तीन वर्षांनी अहिल्याबाईंना एक मुलगी झाली. तिचे नाव ‘मुक्ताबाई’ असे ठेवले. मल्हारराव आणि सासू गौतमाबाई ना खूप आनंद झाला. त्यांच्या अंगाखांद्यावर नातवंडे खेळू लागली
सून नव्हे , तूच माझा मुलगा
असे सुखा समाधानाचे दिवस चालले असता, मध्येच सुखाला ग्रहण लागावे तसे झाले. एक-एक घटना अशी घडू लागली कि, सर्वाना दुःखाचे चटके बसू लागले. मराठेशाही चे पेशवे थोरले बाजीराव अकाली मरण पावले. आणखी थोडे दिवस जात नाही तोच बाजीरावाचे बंधू चिमाजी अप्पा स्वर्गवासी झाले. बाजीराव पेशव्यांच्या गुणग्राहकतेमुळेच मल्हारराव रंकाचे राव झाले होते.बाजीरावांच्यामुळे इंदूरचे सुभेदार होण्याची संधी मल्हाररावांना मिळाली होती. दिल्लीचा मोगल बादशहा शहाआलम संकटात सापडला.त्याने मराठ्यांची मदत मागितली. या लढाईत मराठयांच्या बाजूने अहिल्याबाईंचे पती खंडेराव लढाईत उतरले होते. स्वतः अहिल्याबाई आणि मल्हारराव हेही रणांगणावर होते. तेवढ्यात शत्रूच्या एका गोळीने खंडेरावांचा बळी घेतला. अहिल्याबाईंना पती निधनाचे अति दुःख झाले. अहिल्याबाईंनी सती जायचे ठरविले. अहिल्याबाईंचा निर्णय ऐकून मल्हारवांच्या दुःखाचा बांध फुटला.ते अहिल्याबाईंना म्हणाले,”मुली, खंडू मेला नाही,तूच माझा खंडू आहेस. तुझी कर्तबगारी पाहूनच मी आजपर्यंत जगलो. हि जहागिरी तुझ्यासाठीच सांभाळली. तूच गेलीस तर हे राज्य, हि जहागीर काय कामाची?”सासरे मल्हाररावांची आर्जवी विनवणी ऐकून अहिल्याबाई भानावर आल्या. त्यांना आपली लहान मुले आणि म्हातारे सासू सासरे दिसू लागले . त्या आपले दुःख विसरल्या.
मायेचे छप्पर कोसळले
तशा अहिल्याबाई लेच्या पेंच्या नव्हत्या. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची धमक त्यांच्यात होती. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते.त्या जहागिरीचा कारभार पराकाष्टेने सांभाळत होत्या. एक विधवा राज्यकारभार पाहत आहे म्हूणन कोणीही आपल्या जहागिरीकडे वाकड्या नजरेने पाहू नये, याची खबरदारी त्या घेत होत्या. मल्हारराव आता खूप थकले होते. त्यातच त्याच्या पत्नी गौतमाबाई देवाघरी गेल्या होत्या. यातच मल्हारराव आजारी पडले आणि त्यातच त्याचे निधन झाले. अहिल्याबाईंचा मोठा आधार च तुटला.जणू त्यांच्या जहागिरीचा मोठा खांबाचा मोडून पडला. त्यांच्यावरील अपार मायेचे छत्र कायमचेच हरवले.
स्थितप्रज्ञ अहिल्याबाई
मल्हाररावांचे निधन झाल्यावर त्यांचा नातू आणि अहिल्याबाईंचा मुलगा मालेराव हेच काय ते घराण्याचे कर्ते पुरुष उरले. ते मराठे शाहीतील इंदूर परगण्याचे सुभेदार झाले. यावेळी ते अवघे एकवीस वर्षाचे होते. अहिल्याबाई मुलाकडेच आशेने पाहत होत्या. पण ज्याकडे आशेने पाहावे ते मृगजळ निघावे. हिरा हाती येण्याऐवजी गारगोटी यावी हेच अहिल्याबाईंचे दुःख होते. मुलगा मालेराव वडील खंडेरावांच्या वळणावर गेला होता. आजोबा मल्हाररावांनी स्वतः च्या पराक्रमाच्या बळावर पेशव्यांकडून इंदूर ची जहागिरी मिळवली. कर्तबगारीने ती भरभराटीला आणली. आणि मालेराव मात्र हि जहागिरी, हे राज्य संभाळण्यास,कर्तबगारी गाजविण्यास अपात्र होते. दिवसेंदिवस मालेरावांचे विक्षिप्तपणचे चाळे वाढतच होते. त्याचा लोकांना त्रास होत होता. त्यामुळे अहिल्याबाई खूप दुखी होत होत्या. त्यातच माळरावांच्या मनावर परिणाम होऊन ते आजारी पडले. त्याला बरे वाटावे यासाठी त्या पराकाष्टा करीत होत्या. त्यांच्यावर खूप उपाय,उपचार केले. परंतु अखेर त्यांचा आजार विकोपाला जाऊन त्यातच मालेरावांचा अकाली अंत झाला. अहिल्याबाईंवर जणू कुर्हाडच कोसळली. त्यांच्या दुःखाला पारावार उरला नाही.
अहिल्याबाईंचे तेज प्रकट झाले
फुलाचा सुगंध जसा सगळीकडे दरवळत जातो तसाच अहिल्याबाईंच्या कार्याचा आणि राज्यकारभाराचा सुगंध सगळीकडे पसरला होता. आभाळाएवढे आघात सोसूनही अहिल्याबाई कोलमडून पडल्या नाहीत. प्रजा हीच माझी लेकरे असे मानून त्या प्रजेच्या कल्याणासाठी झिजू लागल्या. कुशल कारभाराने त्यांनी प्रजेचे मन जिंकले.त्या तहानलेल्याची तहान भागवू लागल्या .भुकेलेल्याची भूक भागवू लागल्या. राज्याचे धन म्हणजे प्रजेचीच ठेव. ते त्यांच्या कल्याणासाठीच खर्च केला झाले पाहिजे, असे अहिल्याबाईंचे विचार होते. जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणासाठीच अहिल्याबाई खर्च करू लागल्या. अपार दानधर्म करू लागल्या. राजाला एक न्याय आणि प्रजेला दुसरा असे त्यांनी कधी केले नाही. सर्वानाच त्यांनी समानतेने वागविले. त्यांचा राज्यकारभार न्यायाचा होता. त्यांना अन्याय खपत नसे. अपार दानधर्म आणि परोपकारामुळे सर्व हिंदुस्थानभर त्यांच्या चांगुलपणाचा डंका वाजू लागला होता. एक स्त्री असूनही किती कुशलतेने राज्यकारभार करतात, त्यांचे राज्य किती वैभवशाली आहे याबद्दल अनेकांना कुतुहूल होते, तर काही लोभी माणसे त्यांच्या राज्यावर डोळा ठेवूनही होती. अहिल्याबाई हे सर्व ओळखून होत्या.धार्मिक असल्या तरी त्यांनी कधी उधळपट्टी केली नाही. पै पैचा हिशोब त्या ठेवायच्या. त्या कडक शिस्तीच्या होत्या. चुका करणाऱ्यांना त्या खडसावीतअसत.अहिल्याबाईंचा राज्याचा खजिना सतत धन दौलतीने भरलेला असायचा. त्यांच्या राज्यावर हल्ला करून हि धन दौलत लुटावी असे शेजारील अनेक राज्यकर्त्यांना वाटायचे. पण अहिल्याबाई काही कच्या गुरूच्या चेल्या नव्हत्या. आपल्या राज्यावर अनेक डोमकावळे वाईट नजर ठेऊन आहेत, हे त्यांना आपल्या माणसांकडून कळायचे. त्या मोठया धैर्याच्या आणि धोरणी स्त्री होत्या. कोणी माझ्या राज्यावर चालून आल्यास मी जरासुद्धा घाबरणार नाही. मी हाती तलवार घेऊन उभी राहिले तर भल्या भल्यांची अब्रू धुळीस मिळेल.
प्रजेचे कल्याण हाच माझा आनंद
पराक्रमापुढे आणि कर्तबगारीपुढे जग नतमस्तक होते. अहिल्याबाई बुद्धिमान तर होत्याच, परंतु प्रसंग पडल्यास हाती तलवार घेऊन पराक्रम गाजविण्याचीहि त्यांची हिम्मत होती.त्यांचा देह स्त्री चा असला तरी त्यांच्या मनात आणि मनगटात पुरुषांचे सामर्थ्य होते.म्हणूनच त्यांचा नावलौकीक सगळीकडे पसरला होता. त्या सर्वांच्या कौतुकाचा, आदराचा विषय ठरल्या. एक स्त्री असूनही पुरुषाला लाजवेल अशा कामगिऱ्या त्या पार पाडीत होत्या. त्यामुळे सर्वत्र त्यांचा दरारा वाढला. अहिल्याबाईंनी आपल्या पदरी गुणी माणसांचाच भरणा केला होता. निष्ठावान आणि कर्तबगार माणसे त्यांच्या मदतीला होती. त्या सर्वांच्या सहकार्याने अहिल्याबाई पुढची वाटचाल करीत होत्या.त्या धार्मिक विचाराच्या, देवधर्मावर विश्वास ठेवणाऱ्या असल्या तरी त्यांनी राजकारभारात कधी भावनेला थारा दिला नाही. धर्माची आणि राज्यकारभाराची त्यांनी कधी गल्लत केली नाही. त्यांचे विचार ठाम होते. माणसांची त्यांना पारख होती. चांगल्या गुणांची त्यांना कदर होती. म्हणूनच सर्वांचेच प्रेम आणि पाठिंबा त्यांना लाभला होता. त्या सर्वांशी प्रेमाने वागत. मात्र शत्रूला कडवा प्रतिकार करीत असत. सर्वांशी सलोखा हेच त्यांचे धोरण होते. अकारण युद्ध करण्यास त्यांचा विरोध असे.त्यांचा राज्यकारभार प्रामाणिक होता. कपट कारस्थाने करण्याची त्यांना कधी गरज भासली नाही. त्यांनी अनीतीने कधी कोणावर कुरघोडी केली नाही. दरबारात त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेत असत. पण त्यांच्या मनात कोणते विचार आहेत हे मात्र कोणाला काळात नसे. शेजारी राज्याशी त्यांनी सलोख्याचे, मित्रत्वाचे संबंध ठेवले होते. अनेक राज्यात त्यांनी वकील नेमले होते. तसेच अनेक राज्यांचे वकील त्यांच्याही दरबारात होते. प्रजेला त्यांच्या राज्यात सुरक्षित वाटत असे. प्रजेच्या सुख सोयिनकडे त्यांचे सतत लक्ष असायचे. अन्न-धान्य किंवा पाण्याची टंचाई प्रजेला कधी जाणवत नसे. गरिबांसाठी त्यांनी अन्नछत्रे उघडली होती. सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सोय केली होती. त्या दररोज गरिबांना दानधर्म करायच्या. गरिबांनाही त्यांच्या राज्यात न्याय मिळत होता. अहिल्याबाईंचे राज्य म्हणजे प्रजेला जसे रामराज्याच वाटत होते. प्रजेला अध्यात्मिक करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी देवालय बांधले .
आदर्श प्रशासक
अहिल्याबाईंनी आपल्या आचरणातून प्रजेसमोर मोठा आदर्श ठेवला होता. त्या शिस्तबद्ध आणि कडक असल्या तरी प्रजेशी वागताना त्यांनी कधी अतिरेक केला नाही. प्रजेशी त्यांचा व्यवहार नेहमी माया ममतेचा राहिला. अहिल्याबाईंनी नेहमीच कायद्यांची बूज राखली.न्यायाचे राज्य हेच त्यांच्या राज्यकारभाराचे गमक होते. कोणाकडूनही विनाकारण पैसे घेण्यावर अहिल्याबाईंनी बंदी घातली होती. प्रजेची आपल्या अधिकाऱ्याकडून फसवणूक,लुबाडणूक होऊ नये म्हणून अहिल्याबाई नेहमी जागृत असायच्या. अहिल्याबाईंच्या राज्यात कधीही आपल्यावर अन्याय होणार नाही,याची प्रजेला पूर्ण खात्री होती.
मुलेबाळे नसल्याने एक विधवा स्त्री आपली मोठी धन संपत्तीअहिल्याबाईंना देऊ इच्छित होती. तेंव्हा अहिल्याबाई त्या विधवेला म्हणाल्या,”बाई, हि सर्व संपत्ती तुझी आहे. ती तुझ्याकडेच राहू दे.वाटल्यास एखादा मुलगा दत्तक घे आणि तुझ्या धनाचातुला हवा तसा उपयोग कर.” अशा प्रकारे चालून आलेली संपत्तीही अहिल्याबाईंनी राज्याच्या खजिन्यात जमा केली. सामान्य जनतेला त्यांना दरबारात केंव्हाही येऊन भेटण्याची मुभा होती. म्हणूनच लोक अहिल्याबाईंच्या राज्यात आनंदी होते.
आपले सेनापती तुकोजींचा मुलगा गैरमार्गाने प्रजेकडून संपत्ती गोळा कारतो, हे समजल्यावर अहिल्याबाईंनी त्याला बंदीखान्यात टाकले. घरच्यांना एक न्याय आणि प्रजेला एक, असे दुटप्पी वर्तन त्यांनी कधी केले नाही.
नेहमीच्या व्यवहारतही अहिल्याबाईंचा करारीपणा दिसून यायचा. एका अधिकाऱ्याने एका गृहस्थाला एकदा हकनाक छळले.अहिल्याबाईंना हे कळताच , त्यांनी अधिकाऱ्याला फ़ैलावर घेत म्हटले,”प्रजेच्या गाऱ्हाण्याची अशी वाट लावणे मला खपणार नाही, तुम्ही प्रजेचे म्हणणे एकूण त्यांचे समाधान करायला हवे.”अन्याय झाल्यास अहिल्याबाईंना तो खपत नसे.अहिल्याबाईंना राज्यकारभाराबरोबरच इतरही चांगली माहिती होती. राज्यच्या सीमांची बिनचूक माहिती त्यांना होती. तसेच कायद्यचीही त्यांना चांगली माहिती होती. त्यांची स्मरणशक्ती अफाट होती. कायद्यावर बोट ठेऊन कोणी प्रजेची छळणूक करीत असेल,तर त्या माणसांची त्या तमा बाळगीत नसत . सरकारी पैशाची अफ़रातफपर केली तर त्याला क्षमा नसे.सेवकांवर त्यांचा करडा अंमल होता. सरकारी कामकाजाची त्यांना खडानखडा माहिती असल्यामुळे अधिकारी वर्ग नेहमीच दक्ष असे. अहिल्याबाई म्हणजे त्या काळातील एक उत्कृष्ट प्रशासक असाच त्यांचा नावलौकिक होता.
दुष्टाना शासन करण्यात आणि अनाथांना मदत देण्यात, त्या कधी मागे राहिल्या नाहीत . प्रजेसाठी त्यांनी अन्नछत्रे उघडली.तलाव,विहिरी,धर्मशाळा,रस्ते बांधली. आपल्यानंतरही दानधर्म चालू राहावा याची व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. सर्व लोकांना त्यांनी संपूर्ण स्वांतत्र दिले होते. मदत मागण्यासाठी आलेल्या कोणालाही त्यांनी कधी परत पाठविले नाही. त्या काळातील त्या दानशूर कर्णाच्या दुसरी आवृत्तीचे होत्या. दयाळूपणा, प्रजेविषयी कळवळा, परधर्माविषयी प्रेम, औदार्य, राज्यकारभारातील कौशल्य, चोख राज्यकारभार आणि प्रजेचे कल्याण हे अहिल्याबाईंचे असामान्य कर्तृत्व पाहिल्यावर, अहिल्याबाई खरोखरीच्या ‘पुण्यश्लोक‘ या पदाला पात्र होत्या, हे दिसून येते.
पिकले पान केंव्हातरी गळून पडतेच. अहिल्याबाई आता पिकले पान झाल्या होत्या. आपले दिवस संपत आल्याची त्यांना जाणीव होती. त्यांनी अखेरचा मनासारखा अपार दानधर्म केला. त्या फारशा आजारी नव्हत्या. पण तो शेवटचा दिवस उगवला.इ.स. १७९५ च्या सुमारास पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी शांतपणे स्वरागरोहण केले.
अहिल्याबाईंचे नाव आणि कीर्ती आजही सुवर्णासारखी झळकत राहिली आहे, हेच त्यांचे मोठेपण होय. त्यांच्या स्मृतीला आमचे शतशः अभिवादन
हे पण वाचा- सुंदर मराठी सुविचार
हे पण वाचा – अहिल्याबाई होळकर scholarship