The Biography of Queen Lakshmibai|झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवनचरित्र

The Biography of Queen Lakshmibai|झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवनचरित्र

राणी लक्षमीबाई या मोरोपंत तांबे यांची कन्या

हे तेज काही साधे नाही

परंपरा रूढी म्हणून दसऱ्याच्या स्वारीचा सोपस्कार पार पडला. स्वारी पुन्हा वाड्यावर आली. वाड्यात दसऱ्याचा दरबार भरला. भालदार-चोपदार उभे होते. दरबाराचे मानकरी आपापल्या जागी बसले होते. मोरोपंत आणि बाबाभट पेशव्यांच्या डावीकडील रांगेत बसले होते. रावसाहेब आणि नाना श्रीमंत पेशव्यांच्या शेजारी बसले होते. अशा खास दरबारी वातावरणात झाशी संस्थांचे वेदशास्त्र संपन्न राज ज्योतिषी तात्या दीक्षित श्रीमंत पेशव्यांच्या भेटीसाठी दरबारात आले. भारदस्त व्यक्तिमत्वाचे दीक्षित दरबारात येताच त्यांच्या वयाचा मान राखीत श्रीमंत पेशव्यांनी ,”यावे … यावे … दीक्षित ” असे म्हणून त्याचे स्वागत केले. त्यांना आदराने लोडाला टेकून बसविले. खांद्यावरील उपरणे सावरीत दीक्षित बसले.काखेत धरलेले ग्रंथ काढून ते समोर ठेवले. त्यांची तीक्ष्ण नजर दरबारी मानकऱ्यांवरून फिरू लागली आणि त्यांचे लक्ष वेधले…. त्यांची दृष्टी खिळली त्या बालिकेवर. ती बालिका होती मोरोपंतानाची मनू. वडिलांच्या शेजारी एखाद्या राणीच्या थाटात ती लोडाला टेकून बसली होती.तिच्या मुखावरील तेजाने दीक्षित एकटक तिच्याकडेच पाहत राहिले.त्यांना जणू दरबाराचा विसर पडला.त्यांची तंद्री भंगली ती इंग्रज वकिलाच्या आगमनाने. श्रीमंत पेशव्यांना मुजरा करून वकील एका लोडाला टेकून बसला. पुन्हा दीक्षित मनूकडे पाहू लागले. मोरोपंताच्या कट्यारीचा पात्याशी मनू खेळात होती. ते छोटेसे पती बाहेर काढ, पुन्हा आत ठेव. असे करीत असताना इंग्रज वकील आला तरी त्याची दखल न घेता,त्याच्याकडे तुच्छतेचा एक कटाक्ष टाकून पुन्हा पात्याशी खेळणे, हे तिचे गुण अनुभवी नजरेच्या दीक्षितांनी बरोबर हेरले,”हे तेज काही साधे नाही“असेच मनूकडे पाहून दीक्षितांना वाटले. मनू बद्दल त्यांना कुतुहूल वाटले. कोण बरे असावी हि मुलगी?ती बसते तरी कशी पहा. एखादकी राणीच सिंहासनावर विराजमान झाल्यासारखे वाटत होते आणि तिच्या चेहऱ्यावरचे तेज तरी कसे? काय तिचा रुबाब. नानासाहेबांच्या तेजासारखेच हे तेज दिसत आहे, असे विचार दीक्षितांच्या मनात घोळत असताना पेशव्यांनी मारलेल्या हाकेने ते भानावर आले. ?श्रीमंतांनी मोरोपंतांना बोलावून त्यांची दिक्षीतांशी ओळख करून दिली. प्रथम भेटीतच ते एकमेकांचे स्नेही मी बनले. दरबार आटोपला.दीक्षितांना घेऊन मोरोपंत आपल्या होमशाळेत आले. दीक्षितांसारखे ज्योतिषांचे महापंडित आपल्या घरी आल्याचे पाहून मोरोपंतांना खूप आनंद झाला. आपल्या मनुची पत्रिका दाखवावी का त्यांना, असा विचार त्यांच्या मनात आला. छे !काहीतरीच काय. दीक्षित थोरा-मोठ्यांचे ज्योतिषी. ते आपल्यासारख्या गरीबाच्या मुलीची पत्रिका पाहतील तरी का? त्यांनी नकार दिला तर! त्यांच्या मनात उलट-सुलट विचारांची गर्दी झाली. शेवटी त्यांनी धाडस केलेच. विनवनीच्या स्वरात मोरोपंत म्हणाले,”तात्या ” पण पुढचे शब्द काही बाहेर पडेनात . त्यावर दीक्षित म्हणाले,”काय म्हणता मोरोपंत ?आणि गप्प का बसलात ?काही विचारायचे आहे का ?”तेंव्हा सावरून मोरोपंत म्हणाले,”काही नाही तात्या,पण मनुची पत्रिका आपल्याला दाखवावी हा विचार मनात चमकून गेला एवढेच,” आणि ते पुन्हा गप्प बसले.

मनू राजलक्ष्मी होणार

मनूचा भाग्योदया होण्याची वेळ आली असेच वाटत होते. मोरोपंत गप्प बसलेले पाहून दीक्षित एकदम म्हणाले, “वा … पंत …वा !माझ्या मनातील गोष्ट बोललात. अहो मनुची पत्रिका मी मागूनच घेणार होतो तुमच्याकडून . दाखवा बरे तिची पत्रिका. शास्त्रीबुवानी अशी भावना व्यक्त करताच मोरोपंतांनी लगबगीने मनुची पत्रिका दीक्षितांच्या हाती दिली. विश्वाचे चमत्कार उलगडून दाखवणारे आपले पंचांग दीक्षितांनी उघडले. त्यांची अनुभवी नजर पत्रिकेवरून फिरू लागली.मध्येच ते काहीतरी पुटपुटत. कधी डोळे मिटून काहीतरी विचार करीत. तर कधी बोटे जुळवून कसलेतरी गणित करीत. मोरोपंत त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहत होते. अशाप्रकारे बरीचशी आकडेमोड आणि ग्रहगोलांचे गणित सोडवल्यावर शास्त्रीबुवांनी एकदम मिटलेले डोळे उघडले. आनंदी चेहऱ्याने मोरोपंतांकडे पाहत म्हणाले.”वा …. किती भाग्यवान आहात पंत !तुमची मनू खात्रीने राजलक्षमी होणार!” शास्त्रीबुवा दीक्षितांचे असे उदगार कानी पडताच मोरोपंतांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. पण क्षणात त्यांचे विचार मन वेगळाच विचार करू लागले,”ह्या मनूच्या गरीब बापाजवळ आहे काय ? हृदयाची श्रीमंती,प्रेमाची शाल आणि अश्रुंचे मोती याशिवाय कोणती संपत्ती आहे आपल्याजवळ? आणि शास्त्रीबुवा तर म्हणतात, मनू राजलक्ष्मी होणार !असे जर असते तर माझी मनू माझ्यासारख्या गरीब बापाच्या घरात कशाला जन्माला आली असती. तिचा जन्म श्रीमंताघरीच व्हायला हवा होता. लगेच दुसरे मन म्हणे ,”अरे कसला विचार करतोस ! जरा पहा तरी भविष्यात काय दडले आहे ते दिसेलच कि .” मग भानावर येत ते शास्त्रीबुवांना म्हणाले, “तात्या, मग झाशीतच पहा ना एखादा वर आपल्या मनू साठी .” ” अहो पंत, पाहा नाही, पाहणारच आहे हो. हि मुलगी कोणी साधी-सुधी नाही. भविष्यात असेल तसेच घडेल हो.”शास्त्रीबुवा म्हणाले. यावर अत्यानंद झालेले मोरोपंत म्हणाले, “तात्या , एवढे आपण ठामपणे म्हणता म्हणजे कोणी वर तर शोधला नाही ना तुम्ही ? मोरोपंतांच्या या प्रश्नाने शास्त्रीबुवा थोडे हसतच मोरोपंतांच्या कानाशी हलक्या आवाजात म्हणाले ,”अहो पंत, आणखी कोणी नाही अहो आपले झाशीचे महाराज !” झाशीच्या महाराजांचे नाव कानी पडताच मोरोपंताच्या मनात काहीतरी विचार चमकून गेले. आश्चर्य,नवल, शंका यांनी त्यांचे मन व्यापून गेले. ते दीक्षितांना म्हणाले,”पण तात्या हे कसे काय जुळणार ?आम्ही कुठे आणि कुठे ते.काजव्यांची सूर्याची बरोबरी होते तरी का?” ” पंत मनातल्या शंका कुशंका काढून टाका. यात तसे अवघड काहीच नाही. श्रीमंत पेशव्यांनी जर मनावर घेतले तर संबंध जुळले म्हणून समजा.”मोरोपंत मग भीतभीतच श्रीमंत पेशव्यांकडे गेले. मनातले विचार त्यांनी भीतभीतच श्रीमंत बाजीरावं यांच्या कानी घातले. लागलीच चक्रे फिरू लागली. श्रीमंत पेशव्यांच्या मध्यस्थीने बोलणी सुरु केली. थोड्याच दिवसात झाशीचे महाराज गंगाधर पंत आणि मनूचा साखरपुडा समारंभ झाला. लग्नाची तिथी ठरली. मनूचा विवाह योग्य जुळून आला.

करारी बाणा

काजव्याची आणि सूर्याची कधी बरोबरी होत नाही. तरीही कधी कधी अशक्य ते घडून येते. आतां हेच पहा ना. गरीब मोरोपंतांची मनू कधी एखाद्या राजाची राणी होईल, असे वाटले तरी होते का ?पण तसे घडू आले. श्रीमंत पेशव्यांच्या प्रयत्नाने झाशीचे झाशीमध्ये मोट्या गंगाधरराव आणि मनूचा विवाह समारंभ झाशीमध्ये मोट्या थाटामाटात संपन्न झाला. मोरपंतांची मनू,मत्रिणीचीं छबेली आज झाशीची राणी लक्ष्मीबाई iम्हणून उदयाला आली.

येणार नाही ? त्याने आलेच पाहिजे

नव्या नवलाईचे दिवस सुरु लागले. मोरोपंतांची मनू आता झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई म्हणून वावरू लागल्या होत्या. मोरोपंतही आता झाशीला आले होते. महाराज गंगाधरराव चोखपणे राज्यकारभार पाहात होते. इंग्रजांना चंचू प्रवेश करायला कुठे वाव ठेवला नव्हता. तरीही कपटी स्वभावाच्या इंग्राजांनी बंदोबस्ताच्या नावाखाली आपली तैनाती सेना झाशीच्या राजाकडे ठेवलीच होती. सेनेच्या खर्चासाठी इंग्रजांना काही मुलुख तोडून द्यावा लागला होता. महाराज गंगाधर रावांनी स्वराज्य निष्ठ माणसे अधिकारावर नेमली होती. राजाची कर्तव्ये ते प्रामाणिक पणे पार पाडीत होते. प्रजेचे कल्याण हेच गंगाधररावांचे आणि लक्ष्मीबाईंचे ध्येय होते. न्यायाने राज्य कारभार करणारा राजा प्रजेला आवडला होता. राजे गंगाधर राव स्वभावाने कडक असले तरी तितकेच प्रेमळही होते. अन्याय झालेला त्यांना खपत नसे.अपराध्याला कडक शिक्षा होत होती.

एकदा दसऱ्याचा सण नेमका रविवारी आला. थाटामाटात दसऱ्याची स्वारी सज्ज झाली. बस ,आता इंग्रजी सेना स्वारीत सामील झाली, कि दसऱ्याची स्वारी निघणार होती. इतक्यात रविवार असल्यामुळे आम्ही दसऱ्याच्या स्वारीत सामील होणार नाही, असा इंग्रज अधिकारी जनरल स्लीमन चा निरोप आला. तसे महाराज गंगाधरराव संतापले. जनरलची नाही म्हणायची हिंमत झालीच कशी, असे ते रागातच म्हणाले. जवळच बसलेल्या राणी लक्ष्मीबाईंनी हे ऐकले.”काय म्हणतो जनरल ?येनार नाही! त्याने आलेच पाहिजे. तशी आमची आज्ञाच आहे.” राणी लक्ष्मीबाई कडाडल्या. त्यांचे डोळे संतापाने जणू आग ओकू लागले आणि आपोआप त्यांचे हात म्यानातले समशेरीकडे गेले. संतापलेल्या गंगाधर रावांनी लगेच पुन्हा निरोप पाठवून “स्वारीत सामील झालेच पाहिजे ” असा निरोप इंग्रज जनरल स्लीमनकडे पाठवला. महाराज पुन्हा इंग्रज सेनेची वाट पाहू लागले, तर त्यांच्या म्यानातील समशेर वाट पाहू लागली पुढील संघर्षांची.
तेवढ्यात ढोल, ड्रम च्या आवाजात स्लीमांची सेना त्याच्यासह येऊ लागली. जवळ येताच स्लीमनने महाराजांना मुजरा केला आणि बाजूला अदबीने उभा राहिला आणि मग दसऱ्याची स्वारी इंग्रज सेनेसह थाटाने मिरवत गेली. नाठाळ घोडा सरळपणे वठणीवर येत नाही.बडगा दाखवताच तो सरळपणे चालू लागतो. त्याप्रमाणे महाराजानी बडगा दाखवताच इंग्रज जनरल स्लीमन मुकाट्याने दसऱ्याच्या स्वारीत सामील झाला. महाराज असे तर लक्ष्मीबाई तोडीस तोड. त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. पुरुषी वेष परिधान करून त्या वाड्याच्या चौकात तलवारबाजी चा सराव करायच्या. दांडपट्टा फिरवायच्या. घोड्यावर स्वार होऊन घोडेस्वारी करायच्या. त्यांना घोड्याची चांगली पारख होती. उत्तम घोडा त्या बरोबर ओळखायच्या.झाकल्या मानकांचे तेज हळूहळू प्रकट व्हावे तसे राणीसाहेबांच्या अंगचे राजकर्त्याला आवश्यक असे एकेक गुण प्रकट होत होते.

The Biography of Queen Lakshmibai|झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवनचरित्र

राणीसाहेबांचे सर्वस्व हरपले

राणी लक्ष्मीबाईंचे दिवस आनंदात आणि वैभवात चालले होते. महाराजांबरोबर अनेक तीर्थ स्थळांची यात्रा त्यांनी केली होती. असे आनंदात दिवस चालले असताना राणीसाहेबाना पुत्र योग्य जुळून आला. राजघराण्यातील वारस जन्माला येणार म्हणून प्रजेला खूप आनंद झाला. प्रजेचे आपल्या राणीवर खूप प्रेम होते. त्यातून त्यांची राणी काही अशी तशी नव्हती. तेजसवीपणाचे प्रतीक होती त्यांची राणी. यथाकाल राणीसाहेब प्रसूत झाल्या. पुत्र रत्न जन्माला आले. महाराजाना खूप आनंद झाला. झाशीवासीयांनी आनंदोत्सव साजरा केला. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. नियती कधी कोणाला सुखाच्या शिखरावर नेऊन बसविल , तर कधी एकदम दुःखाच्या दरीत भिरकावून देईल,हे कोणालाच सांगता येत नाही. बाळ तीन महिन्यांचा झाला नाही तोच कश्याच्यातरी कारणाने ते भयंकर आजारी पडले आणि त्यातच त्याचा अंत झाला. राणी लक्ष्मीबाईंचा कुलदीपक काळाच्या एक फुंकरीसरशी कायमचा मालवला गेला. राणीसाहेब आणि महाराज गंगाधरराव दुःखाने वेडेपिसे झाले. हि घटना महाराजांच्या मनावर खूप मोठा आघात करून गेली. ते मनाने आणि शरीराने खचू लागले. काही दिवसांनी तेही भयंकर आजारी पडले. आपल्या राज्याला वारस नाही, एवढे एकमात्र दुःख त्यांना होते. मोरोपंतांनी तर महाराजांना दत्तक पुत्र घ्यावा असे सुचविले. कारभारी मंडळींची सभा भरली. सर्वंनुमतें दत्तक घेण्याचे ठरले. महाराजांच्या घराण्यातील मुलाला दत्तक घेण्याचे ठरले. दरबारी मानकऱ्यांनी दत्तक विधानाची तयारी पूर्ण केली. सर्वाना निमंत्रणे गेली. तशीच इंग्रज अधिकाऱ्यांनाही निमंत्रण पाठवले. यथावकाश दत्तक विधान समारंभ पार पडला. दामोदर नावाचा मुलगा दत्तक घेण्यात आला. सर्वाना पान -सुपारी वाटण्यात आली.राज्याला वारस लाभला म्हणून महाराज गंगाधर रावांनाही फार आनंद झाला. एवढे होऊन देखील महाराजांची प्रकृती सुधारत नव्हती. दिवसेंदिवस महाराजांचा आजार बळावला. राणीसाहेब दिवस रात्र त्यांच्याजवळ बसून त्यांची सेवा करीत होत्या. परंतु घडू नये ते घडलेच. राणीसाहेबांकडे पाहत महाराजांनी मान टाकली. डोळे मिटले ते कायमचेच “महाराज ” असे म्हणत राणी साहेबानी हंबरडा फोडला. दुःखाला वाट करून दिली. राणीसाहेबांचे सर्वस्व हरपले तेही कायमचेच.पण इंग्रजांना मात्र मनातल्या मनात खूप आनंद झालेला दिसत होता, हेच खरेच.

मेरी झाशी नही दूंगी !

राणी लक्ष्मी बाईंचे सर्वस्व हरपले होते. हृदयातला अनमोल ठेवा असं पुत्र नाहीसा झाला, तर सौभाग्याचा धनी काळाने हिरावून नेला, परंतु राणीसाहेब खचल्या नाहीत, कि त्यांनी धीर सोडला नाही.त्यांना का माया नव्हती ?प्रेम नव्हते ? जरूर होते.त्यांची भरली कूस उजाड झाली.सौभाग्य लेणें पुसले होते. पण कर्तव्याला जगणारी माणसे डोंगराएवढे दुःख झाले तरी आपले कर्तव्य विसरत नाहीत. लक्ष्मीबाईंनी दुःखाचे कढ हृदयातच रिचवले. प्रजा हीच माझी लेकरे म्हणत,दुःखाचा भार डोक्यावर वागवीत त्यांनी राज्य कारभार पाहायला सुरुवात केली. महाराजांच्या निधना नंतर काही दिवस जाताच त्या नेहमीच्या कामाला लागल्या .व्यायाम शाळेत त्या व्यायाम घेत. घोड्यावरून रपेट करीत. शुभ्र वस्त्र परिधान करून पूजा अर्चा करीत.दरबारात आलेलया लोकांशी भेट घेत. सगळीकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे. दुपारच्या विश्रांती नंतर पुरुष वेष परिधान करीत. कमरेला तलवार लटकत असे. अशा वेशात त्या साक्षात शालिनी भासत. असा त्यांचा नेहमीचा दिनक्रम असे. राणी साहेबानी राज्याची धुरा आपल्या समर्थ खांद्यावर घेऊन वाटचाल करायला सुरुवात केली होती. पण कारस्थानी इंग्रजांना ते सहन होत नव्हते. हिंदुस्थानातील एक-एक राज्य काहीतरी बहाणा करून त्यांनी स्वतः च्या कब्जात घेतले होते. आता त्यांचा डोळा झाशीच्या राज्यावर होता. हिंदुस्थानाचा इंग्रज गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने हिंदुस्तानातील निपुत्रिक राजांची राज्ये खालसा करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. सारा हिंदुस्थान आपल्या पंखाखाली घेण्यासाठी त्यांनी टाकलेला तो मतलबी डाव होता.श्रीमंत गंगाधररावांनी कायदेशीररित्या दत्तकविधान केले होते. इंग्रज वकिलानेही ते मान्य केले होते. पण विंचवाला कितीही आंजारले-गोंजारले तरी तो डंख मारल्याशिवाय राहत नाही.झाशीचे कायदेशीररित्या अस्तित्वात असलेले वैभवशाली राज्य इंग्रज सरकारने खालसा केले.झाशीचे राज्य खालसा केल्याचा खलिता देण्यासाठी मेजर एलिस झाशीच्या राजवाड्यात आला. राणीसाहेब जाळीच्या पडद्याआड बसल्या होत्या. त्या अडूनच त्या लोकांशी बोलत असत.राणीसाहेबाना मुजरा करीत एलिस म्हणाला, “युवर हायनेस, आम्ही इंग्रज सरकारचे अधिकारी आहोत. त्यांच्या हुकुमावरून हा जाहीरनामा आपणास पेश करीत आहे.”राणीसाहेबांच्या आज्ञेवरून एलिसने जाहीरनामा वाचीत, झाशीचे संस्थान खालसा करण्यात आल्याचे जाहीर केले. इकडे दरबार महालात बसलेल्या राणीसाहेबांच्या रागाचा पारा एलिसच्या शब्दागणिक वरवर चढत होता. त्यांचा स्वाभिमान कारंज्याप्रमाणे उफाळून आला.आकाशात वीज कडाडल्याप्रमाणे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ” मेरी झाशी नहीं दूंगी!
राणीसाहेब भडकल्या. राणीसाहेबानी साफ सांगितले “झाशी सोडू म्हणता ?नाही सोडणार मी! हि मर्द मराठ्याची अवलाद आहे. ज्या कोणाची हिंमत असेल, एक स्त्री म्हणून माझ्यावर चालून येण्याचा कोणाचा विचार असेल त्याने एकदा मराठा तलवारीचे पाणी अवश्य चाखून पाहावे.”धीरगंभीरपणे त्या गरजल्या. मनात हादरलेल्या एलिसने राणीसाहेबांची आज्ञा घेऊन दरबारातून काढता पाय घेतला आणि त्याच क्षणी राणीसाहेब कडाडणारी वीज अदृश्य व्हावी तशा झटकन आतल्या दालनात निघून गेल्या. लबाड कोल्ह्याला सिंहाच्या गुहेतून बाहेर पडल्यावर जसे वाटेल तसे मेजर एलिसला दरबारातून बाहेर पडल्यावर वाटले.

शूर सिंहीण पिंजऱ्यात

सरड्याने रंग बदलावा तसे इंग्रज आपला शब्द फिरवीत होते. दिलेल्या वचनाला हरताळ फाशीच्या होते. ती त्यांची रीत होती. इंग्रज काही हिंदुस्तानचे कोटकल्याण करण्यासाठी येथे आले नव्हते . हिंदुस्तानातील एक-एक राज्य खालसा करीत त्यांना ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करायचा होता. इंग्रजी सत्तेच्या टाचेखाली हिंदी संस्थानिक वाकून जात होते. डलहौसीने अनेक हिंदी संस्थाने खालसा करून सारा भारत आपल्या कब्जात केंव्हा घेतला, हेसुद्धा लवकर कळून आले नाही. भारताच्या स्वातंत्र्य सूर्याला इंग्रजांचे ग्रहण लागले. सगळीकडे अंधार पसरला.पारतंत्र्याचा काळोख्यात भारत भूमी गुरफटून गेली. प्रजा या अंधाराकडे अगतिक पणे पाहत होती. या भीषण अंधाराला चिरत जाणारी सौदामिनी अद्याप प्रकट झाली नव्हती. इंग्रजांनी विझवलेला स्वातंत्र्यदिप कोणीतरी पुन्हा उजळावा, याची गरीब हिंदी जनता वाट पाहत होती. शूर सिहींनीला पिंजऱ्यात बंद करून ठेवताच संतापाने ती जशी अस्वस्थ होते तशीच राणी लक्ष्मीबाईंची अवस्था झाली होती. झाशीचे राज्य इंग्रजांनी खालसा करताच गेलेले स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी काय करता येईल, याचा त्या रात्रंदिवस विचार करीत होत्या.

क्रांतीची ठिणगी पडली

स्वातंत्र्याची खरी किंमत पारतंत्र्य आल्यावरच कळते. इंग्रज मालकाच्या तोऱ्यात वावरत होते. ‘काला आदमी ‘म्हणत हिंदी जनतेचा अपमान करीत होते. इंग्रजांनी हिंदी लोकांची भरती करून लष्कराची उभारणी केली होती. त्याला ‘पलटण ‘असे म्हणत. हिंदी शिपायाच्या अशा अनेक पलटणी होत्या. यातील सैनिकांना इंग्रज साहेबाच्या कठोर शिस्तीचे पालन करावे लागे. तो उठ म्हणाला कि उठायचे.बस म्हणाला कि बसायचे. त्याने काला आदमी म्हणत बुटाच्या लाथा घातल्या तरी खायच्या. असाच खाक्या होता. १८५७ उजाडले. मिरत येथे हिंदी शिपायांची अशीच एक पलटण होती. त्याकाळी बंदुकांच्या काडतुसांना चरबी लावलेली असे. अशी चरबी लावलेली काडतुसे वापरण्याचे काही हिंदी शिपायांनी नाकारले. काला आदमी आज्ञा भंग करतो. म्हणजे काय? इंग्रज अधिकाऱ्यांनी हिंदी शिपायांना लाथा-बुक्यांनी तुडविले ते त्यांच्याकडील बंदुका काढून घेऊ लागले. या घटनेने असांतोषची ज्योय पेटवली गेली. मनात स्वातंत्र्याची ज्योतिपेटलला एक क्रांतिवीर सैनिक पुढे सरसावला. त्याच्या अंगातून स्वातंत्र्याचे रक्त सळसळत होते. तो त्वेषाने पुढे झेपावला आणि …धाड … धाड…. धाड धाड …. त्याच्या बंदुकीतून उडालेल्या गोळ्यांनी कित्येक इंग्रज अधिकारी यमसदनाला गेले.तर कित्येक इंग्रज अधिकारी घाबरून पळत सुटले. स्वातंत्र्यासाठी हातावर शीर घेऊन उठलेला तो क्रांतिवीर होता,शूर सैनिक मंगल पांडे. मंगल पांडे फासावर लटकला.पण इंग्रजाना काय माहित, कि एक मंगल पांडे गेला तरी असे हजारो मंगल पांडे निर्माण व्हायला कितीसा वेळ लागणार. त्याने चेतवलेली स्वातंत्र्य ज्योत मागे होतीच ना? क्रांती ज्योत इकडून- तिकडे मिरवू लागली. अनके ठिकाणी क्रांतीच्या तुतारीच्या पडसाद उमटू लागले. श्रीमंत नानासाहेब पेशवे, दिल्लीचा बादशहा आदी सारे क्रांतिकारक यांना मिळाले. हिंदुस्तानातील जणू क्रांती युद्धाचा वनवाचा पेटला. त्याचे पडसाद झाशीत उमटले.झाशीच्या पलटणातील क्रांतिकारकांनी अनेक इंग्रज अधिकाऱ्यांना ठार करून क्रांतीच्या रनकुंडात त्यांची आहुती टाकली. क्रांतिकारकांनी झाशीच्या किल्ल्याला वेढा दिला. इंग्रजांची गुर्मी अजून उतरली नव्हती. क्रन्तिकारक इरेला पेटले. इंग्रजाना जमिनीवर लोळवूं लागले. अखेर इंग्रजांचा सेनापतीच जमिनीवर कोसळला. इंग्रज शरण आले. झाशी मुक्त झाली. झाशीच्या गळ्या भोवती आवळलेला इंग्रजी फास क्रांतिकारकांनी जीवावर उदार होऊन सोडवला . राणी साहेबाना ते पाहून खूप आंनद झाला.

संकट मालिका

गेलेले राज्य पुन्हा प्राप्त झाले. राणी लक्ष्मीबाई नेटाने राज्यकारभार पाहू लागल्या. पण एक स्त्री झाशीवर राज्य करते आहे, असे पाहून शेजारच्या अनेक राजांच्या तोंडाला पाणी सुटले. एक स्त्री आपल्याशी काय लढणार, असे त्यांना वाटले. मोठी सेना घेऊन ते झाशीवर चालून आले. पण एकाला पकडून राणीने त्याला दिले टाकून बंदीखान्यात. तर दुसरे दोघे राणीचा आवेश आणि हिंमत पाहून आल्यापावली पळून गेले. झाशीवर अशी संकटावर संकटे कोसळत होती. परंतु राणी लक्ष्मीबाई सर्वाना पुरून उरल्या होत्या. क्रांतीची ज्योत अजून काही विझली नव्हती. हिंदुस्थानातील क्रांतीचा आगडोंब शमविण्यासाठी इंग्लंड मधून अनेक रथी – महारथी इंग्रज सेनापती हिंदुस्तानात आले. इंग्रजांनी मोठे सैन्य जमवले.त्यांच्या मदतीला आले घरभेदे काही हिंदी संस्थानिक. असा जंगी सेना,प्रचंड दारुगोळा, तोफा, बंदुका दिमतीला घेऊन इंग्रज सेना क्रांतीकारकांना चिरडून टाकण्यासाठी मार्गस्थ झाली. चारी दिशांनी इंग्रज सेना क्रांतिकारकांनी मुक्त केलेली राज्ये जिंकीत अखेर झाशीपर्यंत येऊन ठेपल्या. पण झाशीचे पाणी वेगळेच होते. सारे क्रांतिकारक झाशीत एकवटले होते आणि मग युद्धाला तोंड फुटले.घनगोर लढाई सुरु झाली. स्वतः राणी लक्ष्मीबाई अंगावर योद्धाचा वेष चढवून शत्रूला आपल्या तलवारीचे पाणी दाखवू लागल्या.तलवारीचा खणखणाट,तोफांचा भडीमार, आगीचे लोळ,प्रेतांचा खच पडू लागला. दोन्ही बाजूची मोठी हानी होऊ लागली. परंतु अखेर बलाढ्य इंग्रज सैन्यापुढे झाशीचा निभाव लागला नाही. अखेर वीरांनी आणि क्रांतिकारकांनी केलेल्या विनंतीला मान देऊन राणी लक्ष्मीबाईंनी झाशी सोडली.

क्रांतिदेवता झाली रणचंडिका

राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम पाहून इंग्रज थक्क झाले. झाशी हातात आली पण पक्षी पिंजऱ्यातून उडाला होता. राणी लक्ष्मीबाई निघून गेल्याची वार्ता इंग्रजाना कळताच इंग्रज सैन्य राणीसाहेबांच्या पाठलागावर निघाले. एका गावात इंग्रजांनी राणीसाहेबाना गाठले. यावेळी राणीबरोबर फक्त पंधरा सैनिक होते. हर-हर महादेवची गर्जना घुमली. राणीसाहेबांनी रणचंडिकेचा अवतार धारण केला. आडवे येईल त्या इंग्रजाला कापीत सुटल्या.इंग्रज साहेब खाली कोसळू लागले.इंग्रजांचे धाबे दणाणले.त्या गडबडीत राणीसाहेब काल्पिकडे दौडत निघाल्या. काल्पीला रावसाहेब पेशव्यांची भेट झाली. स्वराज्य परत मिळवण्यासाठी परकीयांशी झुंजण्याची शपथ घेतली. तोपर्यंत इंग्रज सैन्याने काल्पीवर निकराचा हल्ला चढवला. अवाढव्य इंग्रज सेना काल्पीवर तुटून पडली. लढाईला वेगाने सुरुवात झाली. परंतु क्रांतिकारी सैन्याची शक्ती कमी पडू लागली. क्रांतिकारकांचा पराभव होऊ लागला. तशा राणीसाहेब झंझावातासारख्या इंग्रज सेनेवर तुटून पडल्या. लक्ष्मीबाईंची तळपती तलवार शत्रूची मस्तके जमिनीवर लोळवू लागली. इंग्रजांचा तोफखाना बंद पडला. क्रांतिदेवतेचे ते चैतन्य रूप पाहून इंग्रज सेनेचा थरकाप उडाला. तुफानाने वृक्ष उन्मळून पडावेत तसे लक्ष्मीबाईंच्या तलवारीने इंग्रजांचे लढवय्ये भुईसपाट होऊ लागले. क्रांतिकारक विजयी होणार असे वाटत असतानाच इंग्रजांची राखीव सेना धावून आली.विजयाचे पारडे इंग्रजांकडे झुकले. क्रांतिकारकांचा पराभव झाला. तरी क्रांतिकारक घाबरले नाही. ते ग्वाल्हेर कडे आले परंतु त्यांनी मदत करण्याचे नाकारले. मग नाईलाजाने क्रांतिकारी सेनेने लढूनच ग्वाल्हेरवर ताबा मिळविला. इंग्रजांना हि बातमी कळताच ते ग्वाल्हेरवर चालून आले. तोपर्यंत क्रांतिकारी सेनेत एकदम शिथिलता आली होती. इंग्रजांनी त्याच संधीचा फायदा घेऊन ग्वाल्हेर वर हल्ला चढवला.पराभव समोर दिसू लागताच क्रांतिकारी सैन्याने माघार घेतली. ते पाहून राणीसाहेबांना खूप दुःख झाले. पण एकट्या काय करणार? मारता मारता मारावे असा विचार करून लक्ष्मीबाई दुसऱ्या क्रांतिकारकांची मदत मिळविण्यासाठी दहा-पाच स्वारांसह पुढे दौडत निघाल्या. त्यांचा घोडा भरधाव वेगाने धावत होता. पाठीशी चिमुकला पुत्र दामोदर बांधलेला होता. धावता घोडा एका नाल्यातील पाण्याला बुजला.थांबला. तोपर्यन्त इंग्रज राणीजवळ पोहोचले होते. ते राणीसाहेबांवर तुटून पडले. राणीसाहेब एकट्या तर शत्रू अनेक. राणीसाहेबांची तलवार सपासप चालू लागली. पण तेवढ्यात शत्रूचा वर त्यांच्या नेमका डोक्यावर पडला. राणी रक्ताने भिजली. पण त्याही अवस्थेत दहा-पाच शत्रूची मुंडकी धडावेगळे करून त्या जमिनीवर कोसळल्या. राणीने समोर पहिले. त्यांचे एक विश्वासू सहकारी समोर दिसले. क्षीण आवाजात म्हणाल्या,”देशमुख, माझ्या देहाची विटंबना होऊ देऊ नका.”एवढे बोलून त्यांनी पुत्र दामोदरच्या तोंडावरून हात फिरवत क्षणभर त्यांच्या पापण्या फडफडल्या आणि त्यांनी डोळे मिटले ते पुन्हा न उघडण्यासाठी.

लक्ष्मीबाई गेल्या. झाशीची क्रांतिदेवता पंचतत्वात विलीन झाली. स्वराज्यासाठी लक्ष्मीबाईंनी बलिदान केले. भारतीयांच्या त्या स्फूर्ती देवता झाल्या. त्यानं मनाचा मुजरा.

हे पण वाचा:=अहिल्याबाई होळकर यांचे जीवन चरित्र