
Sardar Vallabhbahi Patel Biography|सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन चरित्र
या तेजस्वी पुरुषाचा जन्म गुजरातमधील करमसद या खेडेगावी ३१ऑक्टोबर १८७५ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. कणखर स्वभावाचा गुण वल्लभ भाईंनी आपल्या वडिलांकडून उचलला. त्यांच्या वडिलांचे नाव जव्हेरभाई. ते एक देशप्रेमी गृहस्थ होते. आपल्या देशावर ब्रिटीश लोक राज्य करतात,याबद्दल त्यांचे मन संतापून उठे. वल्लभ भाईंच्या आईचे नाव लडाबाई . त्या खूप प्रेमळ स्वभावाच्या होत्या. शेजारी लोकांच्या,अडल्या-नडलेल्यांच्या उपयोगी पडणे हा त्यांचा स्वभावधर्म होता. त्या कोणाशी भांडत नसत. त्या सदैव कामात मग्न असत. फावल्यावेळी त्या चरख्यावर सूट काढीत असत. वल्लभभाईंना चार भाऊ आणि एक बहीण होती. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव विठ्लभाई. पुढे या विठ्ठलभाईंनी खूप कीर्ती मिळवली. वल्लभभाईंचे लहानपण खेड्यातच गेले. गुजराती सातवीपर्यंत चे शिक्षण त्यांनी आपल्या गावातच घेतले. त्यांच्या गावापासून दूर पेटलाद या गावी इंग्रजी शाळा होती.त्या शाळेत भाई गेले.
कष्टाचे फळ
त्याकाळी मॅट्रिक होणे म्हणजे खूप मोठी कमाई असे मानले जायचे. भाई मॅट्रिकची परीक्षा पास झाले.आपण बॅरिस्टर व्हायचे, असे त्यांच्या मनाशी आले. हि काही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी खर्च खूप मोठा होता. त्यासाठी त्यांनी वकील व्हायचे ठरवले वकिली करण्यास जो बेडरपणा लागतो,तो भाईंच्या अंगी भरपूर होता. सूक्ष्म द्रुष्टी आणि वागण्यातील रोखठोकपणा यामुळे लवकरच त्याच्या वकिलीत जम बसला. एक चांगले वकील म्हणून त्यांचा नावलौकिक होऊ लागला. आपल्या बुद्धी कौशल्याने ते सर्वांवर छाप पाडू लागले. इंग्रज पोलिस खाते त्यांना भिऊन वागू लागले. त्यांचे बंधू विठ्ठलभाई प्रामाणिकपणे काम करून सरकारी भ्रष्टाचार उघडकीला आणीत होते. त्यामुळे अधिकारीवर्गाने दगा-फटका करून त्यांचा काटा मार्गातून दूर करण्याचे ठरवले. त्यामुळे विठ्ठलभाईंच्या जीवाला धोका उत्पन्न झाला. यावेळी वल्लभभाई आपल्या भावाच्या मदतीला धावून गेले,’माझ्या भावाविरुद्धची कपट कारस्थाने थांबवा’. असा त्यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला. अधिकाऱ्यांनी वल्लभभाईंचे म्हणणे ऐकावेच लागले आणि अशाप्रकारे वल्लभ भाईंनी आपल्या मोठया भावाचा धोक्यात असलेला जीव वाचवला. आता तर त्यांची वकिली खूप जोरात चालू लागली. बॅरिस्टर होणे हि त्यांची जबर महत्वकांक्षा होती. आपली इच्छा सफल होणार याचा त्यांना आनंद वाटू लागला. सरळ मार्गाने, पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने त्यांच्या झोळीत कष्टाचे फळ पडले होते. याच फळाच्या जोरावर ते इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होण्याचे स्वप्न पाहू लागले.
आचार विचारांचा कायापालट
वल्लभभाईं नि इंग्लंड ला जायची जोरदार तयारी केली पण त्यांनी कसलाही विचार न करता मोठ्या बंधुनाच इंग्लंड जायला राजी केले. त्यासाठी पैसा,पासपोर्ट, नवीन पोशाख विठ्लाभाईंना देऊन टाकले. कैक वर्षाच्या आपल्या इच्छेला मागे सारून भावासाठी त्याग केल्याने त्यांच्या मनाला समाधान वाटू लागले. वल्लभ भाईंची हि त्यागाची पहिली पायरी होती.विठ्लभाई गेल्यावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी भाईंवर पडली. ती त्यांनी व्यवस्थित पणे पार पाडली.नंतर बॅरिस्टर होण्यासाठी ते इंग्लड ला गेले. आणि बॅरिस्टरची सनद घेऊन मायदेशी परतले.त्यांची जीवनशैली बदलली होती. भारतातील गरीब लोकांची परिस्थिती मात्र तशीच होती. पारतंत्र्याचे दुःख त्यांच्या वाटेला आले होते. अहमदबादची वकील मंडळी मात्र ऐषारामात गुंग झाली होती. यात भाई सुद्धा होते. पण कठोर परिश्रम, मनाची एकाग्रता, कामावरील अचल निष्ठा या त्यांच्या असामान्य गुणांमुळे यश आणि पैसा त्यांच्या पाठीमागे धावत होता, हे मात्र खरे.गांधीजींच्या समवेत भाईंचा कायापालट झाला.
जनतेचे कैवारी
गांधीजींच्या अध्यक्षतेखाली पहिली गुजरात राजकीय परिषद भरली. राजकीय स्वरूपाचे प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी गांधीजींनी एक समिती स्थापन केली. गांधीजींची कार्य शैली आणि तळमळ पाहून ते नुसतेच पुढारी नाहीत,याची खात्रीच भाईंना पटली. वल्ल्भभाई अहमदाबाद नगरपालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले. नगरपालिकेतील इंग्रज अधिकारी फारच उर्मट आणि सत्ता गाजवणारे होते. जनतेच्या कल्याणाची कामे करण्यात तो अडथळा आणायचा. बेकायदेशीर वागून जनतेला त्रास द्यायचा. मग भाई गप्प बसले नाहीत. त्यांनी गोऱ्या अधिकाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचा ठराव मंजूर करवून घेतला. असे धाडस आजवर कोणी केले नव्हते. त्या जागी पुन्हा नवीन इंग्रज कमिश्नर आला. तोही मिजासखोर निघाला. पगार, भत्ते वाढवून मागू लागला,”पगार, भत्त्ते वाढवून मागू लागला,जमत असले तर राहा,नाहीतर हवा तो मार्ग धरा.” भाईंनी त्याला खडसावले. तो गोरा अधिकारी आला तसा निघून गेला. जनतेची सेवा करण्यात भाईंना धन्यता वाटू लागली. लोकांच्या उपयोगी पडण्यात जे समाधान, जो आनंद मिळतो तो ऐषारामात लोळण्यात मिळत नाही,याची त्यांना प्रचिती आली.
गुरु गांधीजी ।शिष्य वल्लभभाई
मूठभर इंग्रज म्हणजे भारताचे राज्यकर्ते आणि कोट्यवधी गरीब हिंदी जनता त्यांची प्रजा. या प्रजेला गोरे इंग्रज वाटेल तसे पिळून काढीत होते. इंग्रज अधिकारी गरीब शेतकऱ्यांना फुकट राबवून घेत. हि वेठबिगारी बंद करण्याचे गांधीजींनी व भाईंनी ठरवले. जनतेने इंग्रज सरकारची वेठबिगारी करू नये, अशी हजारो पत्रके भाईंनी गांधीजींच्या संमतीने काढून गावोगावी वाटली. त्यामुळे जनतेला आधार वाटू लागला. जनता जागृत झाली. सरकारी जुलमाला कायद्याला विरोध करू लागली. शेतकरी हाच जनतेचा राजा असतो. सावकार, सरकारी अधिकारी त्याला लुटत असतात. त्यातच पूर,दुष्काळ, महागाई, रोगराई या संकटांनी तो अर्धमेला होतो. भाईंनी शेतकऱ्याची सभा भारवली. शेकडो शेतकरी जमा झाले. त्यांनी एकजुटीने सरकारकडे ठराव करून पाठविला. सारा भरण्याची आमची ऐपत नाही. सरकारने सारा वसुली तहकूब ठेवावी. हे ठराव गावोगावी पोहोचले. पण सरकारने शेतकऱ्यांच्या ठरावाला केराची टोपली दाखवली . सरकार ऐकत नाही असे पाहून भाई जुलमी सरकारविरुद्ध दोन हात करण्यास सिद्ध झाले.
वल्ल्भभाई म्हणजे शुद्ध सुवर्ण
हजारो शेतकऱ्यांना एकत्र करून वल्लभभाई अन्यायी इंग्रज सरकारविरुद्ध लढायला तयार झाले गांधीजी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. सरकारने शेतकऱ्याचे म्हणणे ऐकले नाही,तर आम्हाला सत्याग्रह करून न्याय मिळवावा लागेल. इंग्रज सरकारशी असहकार पुकारून आम्ही न्याय मिळवू, असे गांधीजींनी जाहीर केले.गांधीजींच्या म्हणण्याचा सरकारवर काही परिणाम झाला नाही. अखेर गांधीजींनी असहकाराचे शस्त्र उपसले. नडियाडला शेतकऱ्यांची मोठी सभा भरवली. सरकारने कितीही धमक्या दिल्या तरी शेतकऱ्यांनी सारा भरू नये, असे सांगितले. सरकारी कायदा मोडायचा असे भाईंनी सांगितले. बापरे, कायदा मोडायचा ? एक वेळ पोलादी पहार मोडून दाखवू. पण इंग्रजांचा कायदा मोडण्याचे नाव काढताच शेतकऱ्यांना कापरे भरू लागले. इंग्रज सरकारचा तुरुंग,त्यातील छळ त्यांना नजरेसमोर दिसू लागले. परंतु गांधीजींनी वल्लभभाईंनी शेतकऱ्यांच्या मनातली भीती काढून टाकली. पीक नाही तर सारा नाही, असे धोरण असताना, पीक आले नाही तरी सारा भरा, असे सरकारचे अन्यायाचे धोरण आहे. या अन्यायाचा शेवट आपण केलाच पाहिजे,असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी एकजूट करून सरकारी नोकरांवर कडकडीत बहिष्कार घातला. लोक संघटित होत होते. शेतकऱ्यांच्या शक्तीपुढे आपले काही चालणार नाही,हे सरकारच्या लक्षात आले. आणखी फजिती होण्यापेक्षा शेतकऱ्यांची मागणी मान्य करावी, असे सरकारने ठरविले. ज्यांना शक्य असेल त्यांनी सारा भरावा, अशी सरकारने सवलत दिली. गांधीजींनी मग सरकारकडून तसे लिहून घेतले. सत्याचा विजय झाला. लोकशक्तीचा विजय झाला, तर इंग्रज राजशक्ती शरण आली.
यशाची पायरी चढू लागले
संकटात वीराचे धैर्य दिसून येते. तर देशभक्ताचे खरे गुण लोकचळवळीत दिसून येतात. वल्लभ भाईंचे असे गुण दिसून येऊ लागले. आता गुजरातची जबाबदारी गांधीजींनी वल्लभ भाईंवर सोपवली. इंग्रज सरकार भारतीय जनतेवरवाटेल तसे अत्याचार करू लागताच गांधीजींनी इंग्रजांकडे स्वराज्याचीच मागणी केली. सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी असहकाराच्या आंदोलनाला सुरुवात केली. देशभर हरताळ पाळला गेला. वल्लभ भाईंनी ‘हिंदी स्वराज्य’ आणि ‘सर्वोदय’ हि पुस्तके विकायला सुरुवात केली. सरकारने गांधीजींना अटक करताच जनता खवळली. दंग्याला, जाळ पोळीला सुरुवात केली. भाई दंगल ग्रस्त भागात फिरून लोकांना शांततेचे आवाहन करू लागले. जखमी लोकांना मदत करू लागले. सरकारला वठणीवर आणण्यासाठी असहकार आणि कायदेभंग हेच कसे लोकशाही उपाय आवश्यक आहेत, हे ते दाखवून देत असत. एवढेच नाही तर याच मार्गानेआपण वाटचाल केली तर आपल्याला लवकरच स्वातंत्र्य मिळेल, हे त्यांनी जनतेला पटवून दिले.
यशस्वी झेंडा सत्याग्रह
देशात असहकार आंदोलनाचा भडका उडाला. सगळीकडे परदेशी कापडाच्या होळ्या पेटल्या. अहमदाबादमधील होळीत वल्लभ भाईंनी आपल्या घरातील परदेशी कपड्याचा कचरा आणून टाकला. अंगावरचे परदेशी कपडेही त्यात टाकले. भाईंनी खादी अंगावर चढवली. त्यांची मुलेसुद्धा खादीचे कपडे वापरू लागली. खादी हे देशभक्तीचे प्रतीक बनले. खादी उद्योग खेड्यातील गोर गरीब जनतेला संजीवनी देणारा ठरला. अर्धपोटी जनतेला खादीमुळे चतकोर भाकरी मिळू लागली.असहकार आंदोलनाला भरती आली होती. लोक सरकारी नोकऱ्या सोडीत होते. विद्यार्थ्यांनी कॉलेजवर बहिष्कार घातला. नगरपालिकांनी सरकारी बंधने पाळू नयेत, असे भाईंनी सांगितले. “आमची नगरपालिका जनतेच्या इच्छेप्रमाणे कारभार चालवणार आहे.” असे त्यांनी इंग्रज सरकारला ठणकावून सांगितले. त्यामुळे इंग्रज सरकार खवळले. त्यांनी नगरपालिकेच्या शाळांची मदत बंद केली. असल्या भेकड उपायांनी वल्लभ भाई थोडेच नमणार? त्यांनी आपल्या शाळांचा कारभार चालवण्यासाठी स्वतंत्र मंडळ नेमले. या शाळांतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले. या कार्याला गांधीजींनी पाठिंबा दिला. मग मात्र सरकार नेमले. त्यांनी भाईंच्या शाळांना पूर्ववत मदत सुरु केली. वंदे मातरम म्हणण्यावर बंदी, राष्ट्र ध्वज लावण्यावर बंदी ” आम्हाला बंधन घालणारे तुम्ही कोण ” असे वल्लभ भाईंनी इंग्रज सरकारला विचारले. ” ते काही नाही.आमची डोकी फोडा, तुरुंगात घाला. गोळ्या घाला. पण आम्ही आमचा प्रिय झेंडा राष्ट्रीय सप्ताहात उभारणारच.त्याची मिरवणूक काढणारच” असे सर्वानी ठरविले
शुरु हुवा है जंग हमारा ‘असे मनाशी म्हणत,”इन्कलाब झिंदाबाद,भारत माता कि जय ” असा जयघोष करीत भारताच्या अनेक शहरात राष्ट्रध्वज हाती घेतलेल्या तरुणांनी मिरवणुका काढल्या. इंग्रज शिपाई त्यांना लाठीने झोडपत होते. पण तरुण हातातील झेंडे सोडीत नव्हते. सरकारने अनेकांना पकडून तुरुंगात घातले. मग वल्लभ भाई पुढे सरसावले. त्यांच्या योजनेमुळे तब्ब्ल १०९ दिवस झेंडा सत्याग्रह चालू राहिला. जनतेची, तरुणांची हि एकजूट आणि अफाट जनशक्ती पाहून सरकारने पाऊल मागे घेतले. सरकारने वल्लभ भाईंना बोलावून अखेर राष्ट्र ध्वज मिरवीत न्यायला परवानगी दिली. अशा प्रकारे झेंडा सत्याग्रह यशस्वी झाला. वल्लभ भाईंच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.
हजारोंचे प्राण वाचविले
गुजरातची जनता वल्लभ भाईंवर मनापासून प्रेम करू लागली. वल्लभ भाई जनतेचे दुःख दूर करू लागले. वल्लभ भाईंना सांगावे आणि जनतेने ते ऐकावे,असा नवा अध्याय सुरु झाला. वल्लभ भाई एक समर्थ नेता तर त्यांचे अनुयायी निष्ठावंत. एकदा गुजरात मध्ये धो-धो पाऊस कोसळला. जणू वरूण राजा कोपला होता. सर्वत्र हा हा कार उडाला. घरे पडली, शेते वाहून गेली. दळण-वळण बंद पडले. कित्येक गावे पाण्याखाली गेली. जनतेची काय गत होईल, यांची चिंता भाईंना लागली. मध्यरात्रीच ते कंदील घेऊन बाहेर पडले. त्यांनी पावसाने जनतेची झालेली दुर्दशा पाहिली. ते पुरात सापडलेल्या लोकांना मदत करू लागले. सतत तीन दिवस भाई फिरत होते. त्यांनी जीवनावश्यक वस्तू गोळा करून पूरग्रस्त जनतेकडे पाठवायला सुरुवात केली. त्यांनी सरकारला हि जनतेला मदत करण्याची विनंती केली. भाईंच्या प्रेरणेने सगळीकडे मदतीचा ओघ सुरू झाला. देवच आमच्या मदतीला धावून आला असे जनता म्हणू लागली.
भारताचे सरदार
निसर्गाचे संकट संपत नाही,तोच सरकारने छळायला सुरुवात केली. सरकारने शेतसारा भयंकर वाढवला.शेतकरी वाढीव शेतसारा भरू शकत नव्हते. अर्ज-विनंत्याला सरकार दाद देत नव्हते. भाईंनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन सरकारशी लढा द्यायचे ठरवले. सारा बाडोर्ली तालुका वल्लभ भाईंच्या पाठीशी उभा राहिला. तेथे शेतकऱ्यांची मोठी सभा भरली. सरकारविरुद्धच्या आगामी संघर्षाची रूपरेषा वल्लभ भाईंनी शेतकऱ्यांना समजावून सांगितली आणि पुढील परिणामास सिद्ध होण्यास सांगितले. सारा वाढीचा फेरविचार करावा, अशी विनंती भाईंनी सरकारला केली, पण सरकार थोडेच ऐकणार? शेतकरी आणि सरकार यांचा लढा सुरु झाला. जनतेने सरकारवर पूर्ण बहिष्कार घातला. सरकारी अधिकाऱ्यांनी कोणत्याही वस्तू मिळेनात. धोबी त्यांचे कपडे धुवायलाही तयार नव्हते. जनतेने असा कडकडीत हरताळ पाळून सरकारला जेरीस आणले. भाई सगळीकडे फिरून शेतकऱ्यांचे धैर्य वाढवीत होते. शेतकऱ्यांच्या सभेतून लोकांची एकजूट वाढवीत होते. अशाच एका सभेत त्यांना अभिमानाने कोणीतरी ‘सरदार’ या नावाने पुकारले. सरदार म्हणजे सेनापती. वल्लभ भाईंनी बार्डोलीचा शेतकऱ्यांचा लढा इतक्या समर्थपणे,कौशल्याने चालविला होता कि,सर्वचजण त्यांना ‘सरदार’म्हणू लागले.पुढे तर गांधीजी सुद्धा त्यांना सरदार म्हणून हाक मारू लागले.
हाती घेत ते तडीस नेत
इंग्रज सरकारचा मिठाचा जुलमी कायदा मोडण्याचे गांधीजींनी ठरवले. १२ मार्च १९३० रोजी सत्याग्रहींना घेऊन मिठाचा कायदेभंग करण्यासाठी गांधीजी दांडीला निघाले. वल्लभ भाई आता गांधीजींचा उजवा हात बनले होते. त्यांचे कार्य नेटाने चालविण्यास ते अग्रेसर होते. हजारो सत्याग्रहींना घेऊन ते गांधीजींच्या सत्याग्रहात सामील होणार होते. पण त्या आधीच सरकारने त्यांना पकडून तुरुंगात टाकले.सरदारांना तुरुंगात टाकताच गुजरातची नव्हे तर सर्व देशातील जनता क्रोधाने लालीलाल झाली. लोक स्वतः च कायदेभंगाच्या चळवळीत सामील होऊ लागले. स्वातंत्र्य चळवळीचा प्रसार दुप्पट वेगाने सुरु झाला.स्वातंत्र्य चळवळी बद्दल, देशसेवेबद्दल सरकार सरदारांना तुरुंगात घालीत होते,तर भारतीय जनता त्यांच्या गळ्यात हार घालीत होती.लवकरच ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी देशापुढे कोणते प्रश्न आहेत,ते कसे सोडवायचे ते सांगितले. सरदार शूर होते. स्वातंत्र्याची लढाई खेळण्यात तसेच स्वराज्य कसे सांभाळावे,यात कुशल होते. यशस्वी सेनापती इतकेच प्रभावी राज्य कर्तेही होते. गांधीजींनी कायदेभंगाच्या चळवळीला पुन्हा सुरुवात करताच, त्यांच्यासह वल्लभ भाई आणि इतर अनेकांना इंग्रज सरकारने तुरुंगाचा रास्ता दाखवला. तुरुंगातून सुटताच त्यांनी पुन्हा लोकसेवेला सुरुवात केली. गुजरामध्ये प्लेगच्या रोगाने थैमान घातलेअसता ते जनतेच्या मदतीला धावून गेले. त्यांनी स्वतंत्र रुग्णालये सुरु केले. स्वच्छता मोहीम हाती घेतली. त्यांचे शेकडो स्वयंसेवक रात्रनदिवस जनतेला औषधपाणी देत होते. लवकरच त्यांच्या परिश्रमाला यश आले. रोगराई दूर झाली.
स्वप्न साकारले।वल्लभ भाई पोलादी पुरुष बनले
पारतंत्र्याच्या वादळात सापडलेले देशाचे तारू कसेही करून स्वातंत्र्याच्या किनाऱ्याला लावायचे होते. संपूर्ण स्वातंत्र्य पदरात पडेपर्यंत गांधीजी जवाहरलालजी आणि वल्ल्भभाई यांचे प्राण पणास लागले होते. अखेरचे शस्त्र उपसले गेले. १९४२साली गांधीजींनी ‘चले जाव’ आंदोलन पुकारले. इंग्रजांनो ‘चालते व्हा’ चा नारा देशभर घुमला. सारा देश पेटून उठला. त्याच रात्री गांधीजी, इतर अनेक नेते आणि वल्लभ भाईंना पकडून सरकारने तुरुंगात डांबले. तरी स्वातंत्र्य चळवळ जोमाने सुरूच होती. शेवटी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरवले. तुरंगातले खडतर जीवन भोगून,एक हजार दिवस तुरंगात काढल्यानंतर सरदारांची सुटका झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यचे फळ पदरात पडले. पंडित नेहरु पंतप्रधान तर वल्लभ भाई भारताचे उपपंतप्रधान झाले.
भारताचा नवा संसार सुरु झाला. या नव्या संसाराची व्यवस्थित घडी बसवण्याची जबाबदारी वल्लभ भाईंच्या शिरावर येऊन पडली. देशात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे अवघड कार्य भाई वर येऊन पडले. अवघड कार्य भाई करू लागले. पाकिस्तान हे नवीन राष्ट्र निर्माण झाल्यामुळे देशात दंगली पेटल्या होत्या. भारतातले काही संस्थानिक भारतापासून वेगळे राहण्याचा विचार करीत होते. वल्लभभाईंना असा तुकड्या तुकड्यांचा भारत नको होता. त्यांना एकसंघ भारत हवा होता. भारतात अनेक संस्थाने होती. आम्हाला स्वतंत्र राहायचे म्हणत होते. अशावेळी वल्ल्भभाई पुढे सरसावले,’बऱ्या बोलाने,मुकाट्याने भारतात सामील व्हा. जनतेने बंड केले तर तुमच्या मदतीला कोणी येणार नाही’. भाईंनी सज्जड दम देताच,सरळ व्हावे तशी संस्थाने भारतात विलीन झाली. अशाप्रकारे वल्लभभाई देशाची घडी बसवीत असता महात्मा गांधींचा वध झाला. वल्लभ भाईंना अतोनात दुःख झाले. आपले दुःख बाजूला ठेवून त्यांनी देशात पेटलेल्या दंगली शमवायला सुरुवात केली. ते रोज अठरा अठरा तास काम करू लागले. हाडाची काडे करून ते आपल्या स्वातंत्र्य वृक्षाची जपणूक करू लागले. संवर्धन करू लागले. परंतु ते आता ते खूप थकले होते. शारीरिकव्याधींनी उचल खाल्ली होती. तरी अहोरात्र ते राबताच होते. त्यांच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी,जनतेने त्यांच्या वयाला ७५वर्ष पूर्ण होताच,त्याचा भव्य सत्कार सोहळा घडवून आणला. त्यांचे धैर्य,चातुर्य, असीम त्याग संघटन कौशल्य, त्यांची दूरदृष्टी या गुणांचा गौरव केला.
त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त होती. पण शरीर साथ देत नव्हते. एक दिवस ते अंथरुणावर पडले. खूप उपचार झाले पण व्यर्थ १५ डिसेंबर १९५० रोजी आपल्या मातृभूमीच्या निरोप घेत ते निजधामाला गेले. त्यांच्या स्मृतीला आमचे अभिवादन.
हे पण वाचा:-अनंत कान्हेरे यांच्याविषयी संपूर्ण माहिती
हे पण वाचा:-राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती