lokmany tilak|लोकमान्य टिळक

lokmany tilak|लोकमान्य टिळक

टिळकांचा जन्म

  • लोकमान्य टिळक यांचा जीवन प्रवास

टिळक घराणे मूळचे कोकणातले. त्यांना खोत असे म्हणत. रत्नागिरीच्या एका गावचे ते खोत होते. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत. ते शिक्षण खात्यात नोकरी करायचे. त्यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती.

अशा वातावरणात २३ जुलै १८५६ रोजी टिळकांचा जन्म झाला. त्यांचे नाव ‘केशव’ असे ठेवले. परंतु खूप वर्षांनी घरात नवीन बाळ जन्माला आले होते. म्हणून सर्वजण त्यांना लाडाने बाळ असेच म्हणू लागले. आणि तेव्हापासून ते सगळीकडे ‘बाळ’ याच नावाने ओळखले जाऊ लागले. टिळक पाच वर्षाचे असल्यापासून शाळेत जाऊ लागले. वडील गंगाधर पंत त्यांना घरीच शिकवायचे. वार, तिथी,ऋतू, सण, नक्षत्र, श्लोक आणि शुभंकरोती हे सर्व टिळक तीन वर्षाचे होईपर्यंत तोंडपाठ म्हणू लागले. त्यांनी एक श्लोक पाठ केला कि त्यांना एक पै बक्षीस मिळायचे. टिळक शाळेत शिकत होते तरी, घरीही त्यांचे शिक्षण चालू होते. अमरकोश, समासचक्र, रुपावली शिकून ते तयार झाले होते. त्याचवेळी त्यांचा व्रतबंधही थाटामाटात करण्यात आला.त्याचे नाव पुण्याच्या सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. टिळक मुळातच खूप हुशार होते. तेथे त्यांनी दोन वर्षातच तीन इयत्ताचा अभ्यास पूर्ण केला.

बुद्धीची चमक

अनेक वेळा टिळकांच्या बुद्धिमतेची चमक दिसून येत असे. प्रत्येक गोष्टीचा, घटनेचा ते वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करीत असत. जे प्रश्न इतर मुलांना पडत नाहीत. ते प्रश्न टिळकांच्या मनात येत असत. मनात आलेल्या प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय टिळकांना चैन पडत नसत. एवढ्या लहान वयात त्यांच्या बुद्धीची झेप नेहमीच इतरांपेक्षा चार पावले पुढेच असे. अशा गुणांमुळे इतरांशी त्यांचे खटके उडत. गणित हा टिळकांचा आवडीचा विषय. कसलेही गणित घाला, झटक्यात ते सोडवून दाखवीत असत. एकच गणित ते अनेक पद्धतीने सोडवून दाखवीत. त्यांची हुशारी पाहून शिक्षक वर्ग अचंबित होत असे.

कधी कधी अवघड उदाहरणे तर ते तोंडी सोडवून दाखवीत. जे गुरुजींना माहित नसे ते यांना माहित असायचे अनेकवेळा तर गुरुजीच त्यांच्याकडून नव्या आणि सोप्या पद्धतीने उदाहरणे कशी सोडवावीत,याचे प्रात्यक्षिक वर्गात करून घेत असत. टिळकांचे कौतुक सारी शाळा, शिक्षक करीत असत. आपल्या मुलाचे लोकांकडून होणारे कौतुक पाहून गंगाधर पंताना खूप आनंद व्हायचा. पण टिळकांचे कौतुक पाहायला त्यांची आई या जगात नव्हती. टिळक दहा वर्षाचे असतानाच त्या माउली इहलोक सोडून गेल्या होत्या. टिळक आता पंधरा वर्षाचे झाले. घरात त्यांच्या विवाहाचा विषय निघू लागला आणि लवकरच टिळक बोहल्यावर चढले. दापोलीच्या सत्यभामा ह्या टिळकांच्या पत्नी म्हणून वावरू लागल्या.

वल्गना नव्हे, सिंहगर्जना

त्यावेळी आपल्यावर इंग्रज लोकांचे राज्य होते.देश पारतंत्र्यात खितपत पडला होता. इंग्रज सरकारचे अत्याचार, छळवणूक, दडपशाही सहन करीत जनता कसेबसे दिवस ढकलीत होती. जनता इंग्रज सरकारच्या कारभाराला, गुलामगिरीला कंटाळली होती.टिळकांना हे दिसत होते, समजत होते.पण वय लहान असल्याने त्यांना काहीच करता येत नव्हते. म्हणून ते तेंव्हा नेटाने अभ्यास करीत होते. चंद्रकलेप्रमाणे त्यांच्या बुद्धीचा विकास होत होता. टिळक मॅट्रिकच्या वर्गात शिकत असताना मध्येच गंगाधरपंत खूप आजारी पडले, अंथरुणाला खिळले औषध पाण्याचा उपयोग होत नव्हता आणि एके दिवशी गंगाधरपंतांनी या जगाचा निरोप घेतला. टिळकांवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. टिळक मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची नातेवाईक मंडळींनी त्यांना काही सांगायला,उपदेश करायला सुरुवात केली. नोकरी कर असे सांगू लागले. ते म्हणाले वडिलांची इच्छा म्हणून मी उच्च शिक्षण घेईन पण उच्च शिक्षण घेतल्यावर मोठ्या पगाराची नोकरी करिन म्हणता, ते कधीच शक्य नाही या परक्या इंग्रज सरकारची मी नोकरी करणार नाही.बाळ टिळकांचे हे खडे बोल एकूण आणि त्यांचा आवेश पाहून नातेवाईक हळूच घरचा रस्ता धरीत. जाता- जाता एकमेकांना म्हणत,पोरगा आहे जरा तिखट स्वभावाचा. मनात येईल ते करायला मागे- पुढे पाहणार नाही. बोलतो असा जणू कि, ‘सिंहगर्जनाचं’.

विद्येची आराधना

lokmany tilak|लोकमान्य टिळक

किडकिडीत शरीराचे बाळ टिळक आता पिळदार शरीराचे उमदे जवान दिसू लागले. व्यायामाबरोबर ते अभ्यास हि करू लागले मुले आता त्यांना बळवंतराव, असे आदराने म्हणू लागले. रात्री कोणा एका मित्राच्या खोलीवर सर्वजण जमत हास्य विनोदाबरोबरच कधी एखाद्या विषयावर वाद विवादालाही रंग चढे. त्या मित्र मंडळीत टिळकांचा विशेष सूर जुळे तो गोपाळ गणेश अगरकरांशी आगरकर सुद्धा व्यासंगी तरुण होते. टिळक आगरकरात एखाद्या विषयावर असा रंगतदार वाद विवाद होत असे कि, बाकीचे मित्र भान हरपून त्यांचा वाद ऐकत असत. असे दिवस सुरु होते. अभ्यास सुरु होता. टिळक बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर तयांनी कायद्याचा अभ्यास सुरु केला. लवकरच ते एल.एल.बी.ची परीक्षाही पास झाले. बलवान सुशिक्षित तरुण झाले.

जनसेवेची सुरुवात

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे मोठे देशभक्त होते. तरुणांच्या मनात देशभक्तीची चेतना जागवण्यासाठी ते निबंध मालेतून लेखन करीत असत. एके दिवशी टिळक आगरकर चिपळूणकरांना भेटले म्हणाले,’शास्त्रीबुवा, तुमचे विचार आम्हाला समजले. तुमच्या शाळेत शिकवायची आमची मनापासून तयारी आहे.”ते एकूण चिपळूणकरांना खूप आनंद झाला.प्रयत्न सुरु झाले. टिळक-आगरकर आणि शास्त्रीबुवांच्या प्रयत्नातून ‘न्यू इंग्लिश स्कुल’ हि शाळा उभी राहिली. टिळक,या आगरकर आणि अनेक बुद्धिमान विद्यार्थी शिक्षकाचे काम करू लागले. थोड्याच वेळात शाळा नावारूपाला आली. लोक या शाळेची स्तुति करू लागली.पण टिळक आगरकरांचे एवढ्याने समाधान होण्यासारखे नव्हते. लहान मुलांबरोबर त्यांना प्रौढ जनतेचाही जनजागरण करायचे होते. देशाच्या भरभराटीसाठी जनतेला जागे करायचे होते.त्यांनी वर्तमानपत्र काढायचा विचार केला आणि थोड्याच दिवसात पुण्यातून ‘केसरी’ हे वर्तमानपत्र निघू लागले. तर मुबंईतून ‘मराठा’प्रकाशित होऊ लागले. केसरीचा गर्जना लोकांच्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचली. तर कधी इंग्रज सरकारवर कठोर टीकाही होऊ लागली.काहीजण म्हणाले,अशी टीका एखादेवेळी अंगलट येईल. तेंव्हा टिळक म्हणाले,’तुरुंगात जाण्याच्या तयारीनेच आम्ही हे कार्य सुरु केले आहे.’ आणि तसा प्रसंग लवकरच आला.

कोल्हापूरचे छत्रपती म्हणजे जनतेचे आदराचे स्थान, अशा स्थानलाच इंग्रज लोक धक्का लावीत. अशाच एका प्रकरणात टिळक, आगरकरांनी छत्रपतींची बाजू घेऊन आपल्या वर्तमानपत्रात टीका केली. परंतु काही लोकांनी टिळकांवरच उलट खटला भरला. ऐनवेळी काही लोकांनी दगा दिल्यामुळे टिळक, आगरकरांना तीन महिण्याची तुरुंगवासाची शिक्षा झाली.
तुरुंगातल्या गलिच्छ वातावरणाने दोघांच्याही प्रकृतीवर अनिष्ट परिणाम झाला. देशाची चिंता करण्यात आणि पुढील योजना आखण्यात टिळक,आगरकरांनी आपला तुरुंगवास कारणी लावला. टिळक-आगरकर जेंव्हा तुरुंगातून सुटून बाहेर आले, तेंव्हा जनतेने त्यांचे प्रचंड स्वागत केले. देशभर त्यांचे नाव गाजले. जनतेचे प्रेम पाहून टिळकांचे बळ शतपटीने वाढले. ते आणखी मोठे देशकार्य करण्यासाठी सिद्ध झाले.

टिळकांचा हात।करी संकटावर वज्राघात

न्यू हाय स्कुल, केसरी, मराठा यांची वेगाने घोडदौड सुरु होती. त्यानंतर टिळकांनी अनेक उत्साही तरुण मंडळींना एकत्र केले. तरुणांना विद्येबरोबरच देशभक्तीचे धडे देणारे कॉलेज काढण्याचे त्यांनी ठरवले. टिळकांचे राष्ट्रकार्य पाहून डॉ. भांडारकर त्यांच्या मदतीला आले. सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली. टिळक येथेही तन-मनाने राबू लागले. याही कॉलेजचे नाव होऊ लागले. देशाचा संसार सुखी करण्यासाठी टिळक झटत होते. तसाच त्यांना स्वतःचाही संसार पाहावा लागत होता. घर खर्च चालवण्यासाठी त्यांनी कायद्याचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. टिळक इंग्रज सरकारला जसे धारेवर धरायचे,तसे ते समाजाच्या चुकांवरही केसरीतून हल्ला चढवायचे. आपला समाज, आपला धर्म, इतिहास याचा ज्यांना खरा अभिमान आहे, ज्यांना दूरदृष्टीने अभ्यास करून,विचार करून समाज सुधारायचा आहे, अशा लोकांनी स्वतः पासून सुरुवात करावी.

क्राफ़र्ड नावाचा एक इंग्रज माणूस सरकारी खात्यात काम करायचा. लोकांची अडवणूक करून पैसे उकळायचा. एकदा त्याचे हे पाप उघडकीस आले. परंतु तो इंग्रज असल्यामुळे सरकारने त्याला सोडून दिले. उलट काहीही अपराध नसताना काही भारतीय अधिकाऱ्यांना मात्र इंग्रजांनी आरोपी केले अशावेळी टिळक त्यांच्या मदतीला धावले. त्यांना मोलाची मदत केली.तसेच एकदा बडोदे संस्थांचे बापट नावाचे दिवाण संकटात सापडले. ते फार शिस्तीचे होते. अनेकांना त्यांनी मदत केली होती. अशा माणसावर संकट आलेले पाहून टिळक त्यांच्या मदतीला आले. त्यांची या संकटातून सुखरूप सुटका केली.

अशाप्रकारे टिळक अनेकांच्या मदतीला धावून जायचे. कायद्याच्या कचाट्यातून प्रामाणिक माणसाची सुटका करायचे. अशा घटनांनी टिळक जनतेच्या हृदयात आदराचे स्थान मिळवू लागले.

संघटित समाज हेच राष्ट्राचे बळ

फोडा आणि सोडा,असे इंग्रजांचे धोरण होते. भारतीय समाजात भांडणे लावून दिल्याशिवाय आपल्याला येथे राज्य करता येणार नाही, हे इंग्रज लोक ओळखून होते. भारतीय लोकात दुहीचे बीज पेरून, त्यांची आपसात भांडणे लावून इंग्रज येथे सुखाने राज्य करीत होते. टिळकांना इंग्रजांचे हे नाटक पुरते ठाऊक होते. हिंदू समाज बलशाली झाल्याशिवाय हि स्थिती सुधारणार नाही, हे टिळकांनी जाणले होते.

यावर उपाय योजना करायला सुरुवात केली. महाराष्ट्रातून वीर वृत्तीची जणू लोप झाला आहे असा समाज स्वस्थ पडून होता. असा समाज इंग्रजांशी कसा लढणार।टिळकांनी याच कामाला हात घातला. समाज संघटित करण्यासाठी त्यांनी पौराणिक आणि ऐतिहासिक असे दोन सार्वजनिक उत्सव सुरु केले. पूर्वी गणेशोत्सव फक्त घरातल्या घरात साजरा व्हायचा. टिळकांनी तो सार्वजनिकरित्या सुरु केला. महाराष्ट्रात गावोगावी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाले. या उत्सवात देशभक्ती जागृत करणारी अनेक विद्वान लोकांची भाषणे होत असत.वीररसाने रसरसलेली नाटके,पोवाडे सादर होत असत. लहान मुलांचे करमणुकीचे मेळे होत. या मेळ्यातील संवाद आणि गाणी राष्ट्रभक्ती जागी करणारी असत. यावेळी हजारो लोक एकत्र जमत.त्यांच्यात आपलेपणाची आणि देशप्रेमाची भावना जागृत होण्यास मदत होत असे. असाच दुसरा सार्वजनिक उत्सव म्हणजे शिवजयंती. परक्या लोकांनी घातलेल्या धुमाकुळामुळे लोक छत्रपतींना विसरले. समाज पुरुषाचे रक्त जणू थंड पडले होते. टिळकांनी लोकांची भीती दूर केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावरील परक्यांची जुलूमशाही,गुलामगिरी नष्ट करून लोकांचे राज्य स्थापले. त्यांची गुलामगिरीतून सुटका केली. याची आठवण टिळकांनी करून दिली.

सगळीकडे शिवजयंती उत्सव सुरु झाला. हजारो लोक एकत्र जमल्यावर त्यांना आपल्या शक्तीची, एकजुटीची कल्पना आली. लोकांनी अशीच एकी करून इंग्रजांना या देशातून घालवून द्यावे, असा टिळकांचा उत्सवामागचा हेतू होता.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?

त्याकाळी रोगराई आणि दुष्काळ हि संकटे वारंवार यायची. दुष्काळाने होरपळलेली जनता रोगराई आली कि,पटापट मरून जायची. टिळकांच्या उमेदीच्या काळातही महाराष्ट्रावर असेच भयानक संकटे आली. एक वर्षी पुराने शेती पिके वाहून गेली. पुढच्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. लोकांची अन्नपाण्यावाचून दैना उडाली. अनेक लोक गाव सोडून परागंदा झाले. राज्य परक्या इंग्रजांचे.लोकांचे दुःख, हाल अपेष्टा पाहूनही त्या सरकारला कसलीही दया आली नाही. टिळकांनी हे सर्व पाहिले. गावोगावी त्यांनी सभा घेतल्या. लोकांच्या दुःखाला वाचा फोडली. सरकार आणि धनिक लोकांना त्यांनी खडसावले आणि दुखी, गरीब जनतेला मदत मिळवून दिली. दुष्काळाचे संकट थोडे कमी झाले नाही तोच प्लेग या त्याकाळच्या महाभयंकर रोगाने थैमान घातले. टिळकांनी हि परिस्थिती पाहून पुढे धाव घेतली. त्यांनी स्वतः या रोगाबद्दल शास्त्रीय माहिती मिळवली. रोगापासून जीव वाचवण्यासाठी काय उपाययोजना करावी,

याबद्दल त्यांनी केसरीतुन लेख लिहिले. पुण्यात प्लेगने कहर केला. टिळक पेठापेठातून हिंडू लागले. त्यांनी गरीब लोकांना उपचार करण्यासाठी डॉक्टरांना आवाहन केले. लोकांवर उपचार करण्यासाठी नगरपालिकेला रुग्णालय उघडण्यास भाग पाडले. औषध-पाण्यासाठी ज्या गरीब लोकांकडे पैसे नव्हते,त्यांच्या उपचारासाठी टिळकांनी स्वतः पदरमोड केली. जनतेची अशी दैना उडाली असतानाही इंग्रज सरकार लक्ष देत नव्हते. रोगाने जेंव्हा परिसीमा गाठली तेंव्हा इंग्रज सरकारने अघोरी उपाय योजायला सुरुवात केली.सरकारे लोकांना घरातून हुसकावून लावले. पण हे करीत असताना गरीब जनतेच्या सामानाची, कपड्यांची, अन्न-धान्याची नासाडी केली. अति झाल्यावर जनता खवळली. देशभक्त चाफेकर बंधूनी या अत्याचाराला जबाबदार असणाऱ्या गोऱ्या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले. ते पाहून इंग्रज सरकारने लोकांवर सूड उगवायला सुरुवात केली. निरपराध लोकांना पकडून त्यांचा छळ सुरु केला. जुलूमवाढला. ते पाहून टिळकांनी केसरीत अग्रलेख लिहिला. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा जाब इंग्रज सरकारला विचारला. लोकांचे दुःख वेशीवर टांगले. परंतु इंग्रज सरकारने गरिबांना न्याय देण्याऐवजी टिळकांनाच दोषी धरले. टिळक इंग्रज सरकार उलथून टाकण्याचे काम करीत आहेत, असा आरोप ठेऊन त्यांना पुन्हा तुरुंगात धाडले.

लाल, बाल, पाल

तुरुंगातले वातावरण फारच घाणेरडे होते. टिळक खूप आजारी पडले. टिळकांचे काही बरे वाईट होईल, याची इंग्रज सरकारला वभीती वाटू लागली. शिवाय टिळकांवर हो आरोप ठेवला होता, तोही सिद्ध झाला नाही. मग सरकारची अब्रू वाचवण्यासाठी इंग्रजांनी गुपचूपपणे टिळकांना घरी आणून सोडले. चांगल्या वातावरणामुळे टिळकांना बरे वाटू लागले. टिळक सुटले, हि बातमी कळताच जनतेने दिवाळीसारखा आनंद साजरा केला. त्यानंतर टिळकांनी दक्षिण भारत व श्रीलंकेचा दौरा केला. जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या. ते परत पुण्याला आले. लॉर्ड कर्झन या इंग्रज गव्हर्नरने बंगालची फाळणी केली. टिळकांनी केसरीतून सरकारवर जहाल टीका केली. सरकारला नमते घ्यावे लागले. बंगालची फाळणी रद्द झाली.परंतु या निमित्ताने महाराष्ट्राचे टिळक, पंजाबचे लाला लजपतराय आणि बंगालचे बिपीनचंद्र पाल हे नेते एकत्र आले.

राजद्रोही ?छे ।जहाल देशप्रेमी

लवकरच कलकत्ता येथे भारतीय काँग्रेसचे अधिवेशन भरले. राष्ट्रीय शिक्षण, परदेशी मालावर बहिष्कार आणि स्वदेशी चळवळ असे जहाल ठराव टिळकांच्या प्रेरणेने या अधिवेशनात पास झाले. टिळकांच्या जहाल विचारसरणीने भारतीय जनतेत जागृती होऊ लागली.”स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ” असे टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगायला सुरुवात केली. संपूर्ण दारूबंदीसाठी त्यांनी प्रयत्न केला. काँग्रेसच्या अनेक अधिवेशनात त्यांनी लोकांनी एकजूट करून स्वराज्य प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत, यासाठी काय काय करावे ,याबद्दल भाषणे केली. टिळकांच्या अशा जण जागृतीमुळे इंग्रज सरकार हादरले. हा सिंह काहीही करून पिंजऱ्यात कोंडला पाहिजेमी असे त्यांनी ठरवले व एकदा टिळकांना राजद्रोहच्या आरोपाखाली अटक केली. न्यायालयात बरेच दिवस खटल्याचे नाटक उभे राहिले. अखेर टिळकांना सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली.

स्वराज्याचा संदेश

जनतेच्या हृदयात टिळकांना आदराचे स्थान होते. टिळक देशाच्या स्वातंत्र्यासाठी, लोकांवरील अन्याय दूर करण्यासाठी इंग्रज सरकारशी दोन हात करीत होते. त्यामुळे टिळकांना सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली, हे पाहून जनता निराश झाली. इंग्रज सरकारने टिळकांना ब्रह्मादेशातील मंडाले येथील घाणेरड्या तुरुंगात आणून ठेवले. मंडाले म्हणजे जणू यातनागृह. तरीही टिळकांनी येथील सर्व हाल अपेष्टा सोसल्या. ते मधुमेहाने आजारी होते. अशा अवस्थेतही त्यांनी या तुरंगवासातच ‘गीतारहस्य ‘ हा महान ग्रंथ लिहून काढला. त्यांची प्रकृती तुरुंगवासाने खंगली होती. त्यांनी खूप यातना सोसल्या होत्या. टिळक तुरुंगात असताना त्यांच्या घरची सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नी सांभाळत होत्या. टिळकांना काही त्रास होईल असे न करता त्या संयमाने घर-प्रपंच चालवीत होत्या. टिळक अधून मधून घरी पत्रे पाठवून विचारपूस करीत असत.

अखेर तो दिवस उगवला. मुदत संपताच टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. मंडालेची अग्निपरीक्षा देऊन तो स्वातंत्र्य सूर्य घरी आला. जनतेने त्यांची जंगी स्वागत केले.पुण्यातील जाहीर सभेत लोकांनी टिळकांचा गुणगौरव केला. लोकांनी त्यांना ‘लोकमान्य’ हि मानाची पदवी अर्पण केली. यानंतर टिळक देशभर फिरू लागले. जनतेला मार्गदर्शन करू लागले. स्वातंत्र्यचळवळीचे महत्व पटवून देऊ लागले. तरुणांनी सैन्यात भरती व्हावे,असेही त्यांनी सांगितले. अशाप्रकारे टिळकांनी भारतवासीयांना स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यासाठी प्रवृत्त केले. अखंड परिश्रमाने टिळकांचे शरीर थकले होते. प्रकृती साथ देत नव्हती, तरी मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी, भल्यासाठी ते रात्रंदिवस परिश्रम करीतच होते. शेवटी अतिश्रमाने ते खूप आजारी पडल.
टिळकांच्या आजारी पणाची बातमी कळताच देशवासीय चिंतेत पडले. पण अखेर तो दुःखदायी दिवस उगवलाच. एक ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक स्वर्गवासी झाली. एका युगपुरुषाचा अंत झाला.
आपल्या आयुष्यातील चाळीस वर्ष टिळकांनी देशसेवेसाठी खर्च केली. देशाच्या स्वराज्याचा पाया त्यांनीच घातला. ते खऱ्या अर्थाने लोकमान्य झाले
.

हे पण वाचा:- गुप्तहेर बहिर्जी नाईक

हे पण वाचा:- लालबहादूर शास्त्री यांचा जीवनप्रवास