
Inforamation about Anant Kanhere | अनंत कान्हेरे यांच्याविषयी संपूर्ण माहिती
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यापूर्वी सुमारे दीडशे वर्ष आपल्यावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रजांना इथून घालवून देण्याचा पहिला मोठा प्रयत्न झाला १८५७ मध्ये स्वातंत्र्ययुद्ध या ना त्या रूपाने चालूच राहिले. त्यात अनेकजण मृत्यमुखी पडले. या स्वातंत्र्ययुद्धात ज्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली त्यात काही कोवळी तरुण मुलेही होती. त्यांच्यातलाच एक अनंत लक्ष्मण कान्हेरे.
१८९१ मध्ये त्यांचा जन्म झाला, अन अवघ्या १९ व्या वर्षी त्याला फाशी देण्यात आली.कशाबद्दल? त्याने जॅक्सन नावाच्या एक इंग्रज अधिकाऱ्याचा वध केला म्हणून मंगळवार दि. डिसेंबर १९०९ रोजी,नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात सर्वा समक्ष पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याने हा वध केला म्हणून।का केले त्याने हे कृत्य ? तो माथेफिरू होता ? वेडा होता? रानटी होता ? हिंसक होता? अतिरेकी होता? कि त्याला आपण काय करीत आहोत हे कळत नव्हते? कि आपण केलेल्या कृत्याचा काय परिणाम होणार हे त्याला माहित नव्हते?
त्याला तर पूर्णपणे माहित होते कि जॅक्सनला मारल्यावर आपल्याला फासावर लटकावे लागणार आहे. तरीही त्याने जाणूनबुजून, विचारपूर्वक जॅक्सनला मारण्याचे हे कृत्य केले होते. कारण त्यामुळे ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्धातले भारताचे एक पाऊल पुढे पडणार होते. कोण होता हा जॅक्सन? जॅक्सन नाशिक जिल्ह्याचा कलेक्टर होता. ब्रिटिश सतेचा प्रतिनिधी, इंग्रज राज्य झुगारून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीयांचा विरोधक, स्वातंत्र्यप्रेमी भारतीयांचे जीवन उध्वस्त करणारा,त्यांना चिरडून टाकणारा इंग्रज अधिकारी.
अनंत कान्हेरे शपथविधी
अनंता कान्हेरेचे मुळ गाव कोकणात, रत्नागिरी जिल्ह्यात, खेड तालुक्यातले,आयनी मेटे पण अनंता शिक्षणासाठी औरंगाबाद इथे राहत होता. तिथे त्याचे मामा होते. पुढे ते हैद्राबादला गेले. पण मग अनंता काही दिवस बार्शी इथे आपल्या भावाकडे राहून पुन्हा औरंगाबादला आला. तो तिथे इंग्रजीबरोबरच चित्रकला शिकत असे. त्याला सरकारची शिष्यवृत्ती मिळत असे. गंगाराम मारवाडी सराफ यांच्या घरात तो राही. गंगाराम त्याच्यापेक्षा वयानं दोनच वर्षांनी मोठा. दोघांची गाढ मैत्री होती. गंगाराम व्यापारी होता, पण त्याच्या मनात देशभक्तीची ज्योत निर्माण झालेली होती. त्याने देशभक्तीची गुप्त शपथ घेतलेली होती. गंगारामशी बोलताना अनंताने त्याला म्हटले,’ मला देशासाठी प्राण अर्पण करण्याची इच्छा आहे.’ अनंताचा विचार हा गंगारामला आवडणाराच होता.पण मग गंगारामने अनंताची परीक्षा घेतली.त्याने राँकेलची चिमणी पेटवली. त्या चिमणीचा काच तापू दिली आणि ती तापलेली काच अनंताला हातात धरायला सांगितली.एखाद्या फुलांचा गुच्छ हातात धरावा,तशी ती काच अनंताने दोन्ही हातात धरावा,तशी ती काच अनंताने दोन्ही हातात धरून ठेवली. दोन्ही तळहात होरपळले,पण अनंता शांत होता. अनंता काहीतरी पराक्रम करून दाखवील याची गंगारामला खात्री पटली आणि त्याने त्याला क्रांतिकारकांची गुप्त शपथ दिली.
अनंता स्वतः बुद्धिमान होता.कलावंत होता. चित्रकलेचे तर तो शिक्षणच घेत होता. शिवाय तो नाटकांमधूनही काम करी.दिसायला तो सुरेख असल्याने त्याच्याकडे स्त्री पात्राचे काम येई. (त्या वेळी नाटकात स्त्रिया काम करीत नसत )या अनंताने एक ‘मित्रप्रेम’ नावाची कादंबरीही लिहिलेली होती. त्याचे विचार प्रखर होते. सकाळ केसरी हि वृत्तपत्र तो वाचीत असे.
क्रांतिकारकांचा आदर्श
१९०८ साली लोकमान्य टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेली त्याला माहित होती. मुजफ्फरपूरला खुदिराम बोस ने केलेला बॉम्बस्फोट तो जाणत होता. अगदी अलीकडेच इंगलण्ड मध्ये मदनलाल धिंगरा ला फाशी दिल्याचेही त्याला माहित होते. आपणही मदनलाल धिंगारासारखा पराक्रम केला पाहिजे, असे त्याला वाटू लागले होते.
गणू वैद्यांशी परिचय
अशीच त्याची नाशिकच्या एका तरुणाशी औरंगाबादेत गाठ पडली. या तरुणाचं नाव गणेश बळवंत वैद्य.त्याला गणू वैद्य म्हणत. गंगारामची आणि त्याची येवले इथे ओळख झालेली होती. गंगारामच्या ओळखीने गणू औरंगाबादेत आला होता.तो क्रांतिकारक संस्थेचा सभासद होता. या संस्थेसाठी शस्त्रे मिळवण्याचा काम त्याच्याकडे होते. औरंगाबादेस शस्त्रे मिळू शकतील असे गंगारामने त्याला सांगितले होते. म्हणून तो औरंगाबादला आला होता. गणूची आणि अनंताची गाठ पडली. पुष्कळ गप्पा झाल्या. अनंताने त्याला विचारले,’ ज्या जॅक्सन ने बाबाराव सावरकरांना जन्म ठेपेची शिक्षा दिली तर त्या जॅक्सनला तुम्ही लोकांनी जिवंत कसे ठेवले आहे? तेंव्हा गणू म्हणाला,’आमच्याकडे असा कुणी धाडसी माणूस नाही कि जो जॅक्सनला मारील.
माझी त्याला मारायची तयारी आहे, अनंताने गणूला सांगितले. गणूने नाशकात आल्यावर हि हकीकत आपल्या मित्राना सांगितली आणि अनंताला नाशिकला बोलावून घेतले.
विनायकराव देशपांडे यांची भेट
१९ सप्टेंबर १९०९या दिवशी अनंता नाशिकला आला. गणू त्याला नाशिक येथे विनायकराव देशपांडे या आपल्या मित्राची गाठ घालून दिली. विनायक नारायण देशपांडे हे शाळेत शिक्षक होते. वय अवघे २१ वर्ष. त्यांच लग्न झालेलं होते. त्यांच्या घरी गुप्त बैठक होत असत. देशपांडे यांनी अनंताला एक पिस्तूल दिले. देशपांडे, गणूं वैद्य आणि तिसरे एक दाजी जोशी यांच्याबरोबर अनंता गावाबाहेर गेला. तिथे त्याने झाडांवर नेम धरून पिस्तुलातून गोळी झाडण्याचा सराव केला. असा सराव त्याने दोन दिवस केला. कलेक्टर कचेरीत जाऊन त्याने तिथे जॅक्सनला नीट बघून घेतले आणि जॅक्सनला मारल्यावर आपण फाशी जाणार तेंव्हा आपल्या आई-वडिलांसाठी आठवण असावी म्हणून फोटोग्राफरकडे जाऊन आपला एक फोटो काढून घेतला.
विलंब
जॅक्सनला मारण्याची सर्व सिद्धता झाली. पण त्याला आपला बेत लांबणीवर टाकावा लागला.कारण? कारण गणू वैद्य. अनंता जॅक्सनला ठार मारणार, या कल्पनेने गणू गांगरला असावा. कदाचित या घटनेनंतर आपणही पोलिसाच्या तावडीत सापडू या विचाराने तो घाबरला असावा. त्याने अनंताला सांगितले,’ जॅक्सनला मारण्याची कामगिरी तुझ्या एकट्यावर पडते आहे, हे ठीक नाही. तुला कोणीतरी जोडीदार हवा. तू जोडीदार माग.त्याशिवाय हे काम करू नकोस.’ पण गंगू असे मात्र म्हणाला नाही,कि तुला हे काम जमलं नाही तर मी आहेच तुझा जोडीदार । गणूने आणखी के अडचण सांगितली. नाशिकच्या या क्रांतिकारक तरुणाचे पुढारी त्या वेळी मुंबईत होते. त्यांचे नाव कृष्णाजी गोपाळ कर्वे. त्यांना अण्णा कर्वे म्हणत. वय अवघे तेवीस वर्ष. पण वयाने त्यातील त्यात वडील.शिवाय शिकलेले. नाशिकला मॅट्रिक होऊन ते मुंबईला एलिफन्स्टन कॉलेजात गेले होते. शिवाय मुंबईत ते वकिलाचाही अभ्यास करीत होते. त्यांचं नेतृत्व नाशिकची हि तरुण मंडळी मानीत असत.अनंताची विशेष ओळख फक्त गणुशीच होती. त्यामुळे त्याने गणूचे ऐकले आणि देशपांडे,दाजी जोशी यांना सांगितले,तुमच्या प्रमुखांची संमती मिळावा आणि मला एक जोडीदार द्या. मग मी हे काम करिन.’ अनंताला जोडीदार देणे सोपे होते. कारण विनायकराव देशपांडे यांनी स्वतः च तशी तयारी ठेवलेली होती. पण प्रमुखांची संमती मिळवायची तर निदान अण्णांची भेट तरी व्हायला हवी होती. आणि अण्णा तर मुंबईला होते.
त्यामुळे जॅक्सनचे मरण काही काळ पुढे ढकलल्या गेल्याने अनंता औरंगाबादला परतगेला.जॅक्सन एकदा नाशिक सोडून गेला म्हणजे मग त्याला मारणे कठीण होईल हे कर्वे यांना जाणवले आणि त्यानी त्यांच्या वधाची योजना आखली अनंता कान्हेरेंवरच त्यांनी हि कामगिरी सोपवायचे ठरवले. कारण क्रांतिकार्यात जेवढे अधिक तरुण प्राणार्पणासाठी सिद्ध होतील तेवढे हवेच असतात. जॅक्सनचा वधाचा मुहूर्तही त्यांनी नक्की केला- २१ डिसेंबर १९०९ मंगळवार रात्री ९च्या सुमारास।नाशिक इथल्या विजयानंद नाट्यगृहात.
जॅक्सनचा सत्कार
नाशिकच्या लोकांनी ठरवले, जॅक्सनच्या सत्कारासाठी त्याला या नाटकाला बोलवायचे आणि मध्यंतरात त्याचा सत्कार करून त्याला निरोप द्यायचा. पण जॅक्सनला त्या दिवशी वेळ नव्हता,म्हणून मग त्याच्या सोयीने नाटकाचाच दिवस बदलण्यात आला. मंगळवार दि.२१ डिसेंबर. जॅक्सन नाटकाला येणार आणि त्याचा तिथे सत्कार होणार,याची जाहिरातही केली गेली होती. कर्वे यांनी या कार्यक्रमातच जॅक्सनला या जगातूनच कायमचा निरोप देण्याचा विचार करून ठेवला.
पूर्वतयारी
दि २१ डिसेंबरच्या दुपारी ४ च्या सुमारास गाडी नाशिकरोड स्टेशन वर आली. जोशी आणि अंकुशकर यांना घ्यायला गणू स्टेशनवर आलेला होता. त्यांना घेऊन तो नाशिक शहरात गेला अनंता थोडा वेळ स्टेशनवर रेंगाळून मग नाशिकला आला. नाशकात येऊन तो देशपांडे यांच्याकडे आला. पण त्याला तिथे देशपांडे भेटले नाहीत. शंकर सोमण नावाचा मुलगा भेटला. त्याने अनंताला दोन पिस्तुले दिली. कर्वे यांनी गणूकडून एकूण तीन पिस्तुले मागून घेतली होती. त्यातीलच हि दोन होती. शंकरने अनंताला एक कागद वाचायला दिला. त्यावरील मजकुराचे शीर्षक होते.” खुनास खून ,जुलमाचा प्रतिकार”
अनंताला पकडण्यात आल्यावर जबाब द्यायचा प्रसंग आल्यास त्याने द्यायचा हा जबाब होता. अनंताने तो वाचला मग शंकराच्या सूचनेवरून स्वतःच्या हस्ताक्षरात त्याची प्रत काढून घेऊन ती त्याने कोटाच्या खिशात ठेवली. ते झाल्यावर शंकराने त्याला एक विषाची पुडी आणि एक पेढा दिला आणि सांगितले,’हे बघ, काम झाले कि स्वतःवर पिस्तूल झाडून घे किंवा हे खाऊन ताक, म्हणजे आणखी कुणाला त्रास होणार नाही आणि जिवंत पकडला गेलास तर नावगाव सांगताना उत्तर हिंदुस्तानातले एखादे सांग. अनंताने शंकराला विचारले,अण्णा कर्वे कुठे आहेत? ते मुंबईला गेले आहेत, पण हे निवेदन त्यांनीच लिहिले आहे. शंकराने अनंताला सांगितले. नाटक रात्री ९वाजता सुरु होणार होते. अनंता जवळजवळ तासभर आधीच नाटकगृहापाशी आला. तिथे त्याला विनायकराव देशपांडे भेटले. त्यांनी त्याला नाटकाची दोन तिकिटे दिली. एक खुर्चीच होते. जिथे जॅक्सन बसणार होता त्याच्या मागच्या बाजूचे. दुसरे हलक्या दर्जाचे होते. पडद्याच्या बाजूला ओट्यावर बसून नाटक पाहण्यासाठी असेलेले. अनंताने हि तिकिटे घेतली. ती दोन होती.तेंव्हा त्याने विनायकरावांना विचारले, तुम्ही येणार ना? “होय देशपांडे म्हणाले आणि दुसऱ्या रांगेतल्या एका खुर्चीकडे दृष्टिक्षेप करीत त्यांनी अनंताला सांगितले,” तो पहा ते अण्णाही तिथं बसलेला आहे. तुला आजचे काम कोणत्याही कारणांनी जमले नाही,तर तो हे काम करणार आहे. आणि त्यालाही समजा जमले नाही,तर मी ते करीन.पण आज काम झालेच पाहिजे.जॅक्सनला कुठून मारायचे ते आता त्यानेच ठरवायचे होते,जॅक्सन बसेल त्याच्या मागे बसून कि पुढच्या बाजूला ओट्यावर बसून ? अनंताने समोरूनच त्याला मारायचा पर्याय पसंत केला आणि त्याप्रमाणे तो ओट्यावर जाऊन बसला.
जॅक्सनचे आगमन
नाटक शिरस्त्याप्रमाणे वेळेवर सुरु झाले. जॅक्सनला आलेला नव्हता. पहिल्या अंकातला दुसरा प्रवेश सुरु झाला. एक गीत सुरू झाले. आणि एवढ्यात जॅक्सनची घोडागाडी थिएटरपाशी येऊन थांबली. त्याचे स्वागत करण्यासाठी लगबगीने सरकारी अधिकारी त्याला सामोरे गेले. त्या सर्वांच्या बरोबर आणि आपल्या बरोबरच्या दोन युरोपीय स्त्रियांसह जॅक्सनच नाट्यगृहात शिरला, ओट्याजवळच्या पहिल्या दरवाजातून.
अखेर शिकार साधली
अनंताने जॅक्सनला नीट पाहून ठेवलेले होते. तो आत शिरताच अनंता उठून उभा राहिला आणि जॅक्सन आपल्या खुर्चीकडे जात असताना त्याने त्याच्यावर एक गोळी झाडली पण ती गोळी जॅक्सनला लागली नाही. ती त्याच्या काखेतून निघून गेली. अनंता चपळाईने जॅक्सनच्या पुढे येऊन उभा राहिला आणि त्याने आपल्या पिस्तुलातून लागोपाठ चार गोळ्या त्याच्या छातीत झाडल्या. या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधले गेले. अनेकांना वाटले, स्वागताचे फटाके वाजत आहेत. पण लवकरच खरा प्रकार लोकांच्या लक्षात आला. जॅक्सन रक्तबंबाळ होऊन खाली मरून पडला होता. बाजूच्या सरकारी अधिकाऱ्यांनी अनंताला पकडले होते. एकाने तर त्याच्या डोक्यावर आपल्या जवळच्या दंडुक्याने प्रहार केला होता. अनंताच्या कपाळावर जखम होऊन रक्त ओघळू लागले होते. अनंता शांत होता. त्याला स्वतःवर पिस्तूल झाडून घेता आले नाही कि विषही खाता आले नाही. पण खरे म्हणजे त्याला आत्महत्या करायची इच्छाही नव्हती. फासावर जाऊन त्याला तरुणांपुढे एक उदाहरण घालून द्यायचे होते. जॅक्सन खाली कोसळला तसे नाट्यगृहातले वातावरण एकदम बदलले. नाटक बंद पडले. एकच गोंधळ माजला गडबडीत काही लोक बाहेर पडले. त्यातच देशपांडे अलगद बाहेर निसटून गेले.
गणू वैद्याची घाबरट
नाट्यगृहात जॅक्सन मारला गेला हि वार्ता तिथून बाहेर पडलेल्या घाबरट लोकांकडून कर्णोपकर्णी झाली. रात्री दहाच्या सुमारास हि वार्ता गणू वैद्याकडे येऊन पोहोचली. केशव परांजपे या त्याच्या मित्रानेच त्याला हे येऊन सांगितले. आणि सूचनाही दिली- तुझ्याजवळ काही आक्षेपार्ह वस्तू असतील तर त्या नाहीशा कर.
गणूकडे पाहुणा म्हणून आलेला दत्तू जोशी हे ऐकत होता, त्यानेच नक्की हे काम केले. तो आपल्याबद्दल काही सांगू नये म्हणून त्याने आम्हाला शपथ घेतलेली होती. गणू या वार्तेने पार भेदरून गेला. त्याने आपल्याजवळची पिस्तुले आणि इतर सामान एका गाठोड्यात भरून ते गाठोडे शेजारच्या घरावर कौलाच्या खाली दडपून ठेवले.
दत्तू व काशिनाथ यांना अटक
दत्तू जोशी आणि काशिनाथ अंकुशकर नाशिकरोड स्टेशन वर आले. तोपर्यंत मूंबईकडे जाणारी गाडी निघून गेलेली होती. रिकाम्या प्लॅटफॉर्मवर ती दोघे हिंडू लागली. पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त ठेवलेला होता. स्टेशनवर काही उद्योग नसताना हिंडताना या दोन मुलांना पोलिसांनी हटकल आणि त्यांची चौकशी केली. त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळली,तेंव्हा ते त्यांना घेऊन आपल्या अधिकाऱ्याकडे आले. हि मुले औरंगाबादची आहेत हे कळल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांच्या साहाय्याने गणूचे घर गाठले आणि एका धाग्याने दुसरा धागा असे करीत सगळी हकीकत शोधून काढली.
आठ जणांवर खटला
जॅक्सनचा खून करण्याच्या आरोपावरून पोलिसांनी एकूण आठ जणांवर खटला भरला.या खटल्याचे प्राथमिक काम नाशिक इथे झाल्यावर तो मुंबई इथे खास न्यायालयात नेण्यात आले. अनंताचा भाऊ तुरुंगात त्याला भेटला आणि वकिलाची व्यवस्था करतो म्हणाला. पण अनंताने वकील घेण्याचे नाकारले.अठरा वर्षाच्या या मुलाने आपली बाजू कोर्टात स्वतःच मांडली. सरकारी साक्षीदाराची उलट तपासणीही स्वतःच घेतली.तीन न्यायाधीशांपुढे हा खटला चालला. बेसिल स्कॉट, हीटन आणि चंदावरकर. यापैकी हिटन यांनी अनंताच्या धैर्याबद्दल गौरवोदगारही काढले.
कर्वे यांचे आत्मसमर्पण
कर्वे यांनी प्रथम गुन्हा नाकबूल केला होता. पण त्यांच्या लक्षात आले कि पोलिसानी सर्व धागेदोरे जुळवले आहेत.त्यामुळे आपल्याला बहुधा जन्मठेपेची शिक्षा होईल. असा विचार करून अण्णांनी हि वधाची सर्व योजना आपण केल्याचे कोर्टात स्पष्ट सांगितले. गणू वैद्य आणि दत्तू जोशी हे या खटल्यात माफीचे साक्षीदार झाले होते. म्हणजे त्यांना सरकारने आधीच माफी देऊन ठेवली होती. या खटल्यात काशिनाथ अंकुशकरला निर्दोष म्हणून मुक्त करण्यात आले. दत्तू जोशी यास दोन वर्ष आणि गणू वैद्य ला जन्मठेप अशी शिक्षा दिली. दाजी जोशी आणि शंकर सोमण यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि विनायकराव देशपांडे, अण्णा कर्वे व अनंत कान्हेरे या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
अखेरचा दिवस
दि. १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाणे येथील तुरुंगात सकाळी सात वाजता अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे आणि विनायकराव देशपांडे यांना फाशी देण्यात आली. तिघेही भगवत गीतेची प्रत हातात घेऊन आनंदाने फाशी गेले. अनंताला त्याचा भाऊ एकदा तुरुंगात भेटला होता. तेंव्हा त्याने आपल्या आईवडिलांना भेटायला आणू नकोस म्हणून सांगितले होते. त्यांना दुःख झालेले मला पाहवणार नाही असे तो म्हणाला होता. त्यामुळे या वीर पुत्राला जन्म देणाऱ्या माता पित्यांनाही त्याचे दर्शन मिळू शकले नाही. फाशीच्या दिवशी या तिघांच्या कुणाही नातेवाईकांना सरकारने येऊ दिले नाही. या तिघांची प्रेते देखील सरकारने नातेवाईकांच्या ताब्यात दिली नाहीत. सरकारी अधिकाऱ्यांनीच त्यांची प्रेते ठाण्याच्या खाडीवर नेऊन जाळून टाकली आणि त्यांची हाडे आणि राख खाडीत टाकून दिली. ह्या क्रांतिकारकांची राख हि मागे उरू नये.
अमर क्रांतिवीर
पण तरीही या क्रांतिकारकांची स्मृती पुढच्या पिढ्यानी जागृत ठेवली आहे. कारण, त्यांच्याबदलीची कृतज्ञता। त्यांनी केलेला पराक्रम, त्याग, त्यांच्याबद्दलची पूज्यबुद्धि। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यास अनंता कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांच्या प्राणांचे बलिदान कारणीभूत झालेले आहे.