Healthy Foods For Kids|बाळाचा आहार कसा असावा
तर मैत्रिणींनो तुमच्या बाळाचा आहार कसा असावा हे आपण इथे बघणार आहोत.
जाणून घ्या लहान बाळांचा आहार
आहार आणि आरोग्याचा अगदी जवळचा संबंध असल्यामुळे मुलांचा आहार कसा असावा याविषयी समजून घेणे महत्वाचे आहे.कारण मुलांचा आहार परिपूर्ण नसल्यामुळे पोषक घटकांच्या अभावामुळे प्रतिकार शक्ती कमी पडते. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच न देणे कधीही चांगले.
मुलांना सगळ्या प्रकारचे अन्न खाण्याची सवय लावणे केंव्हाही चांगले , परंतु पुष्कळ वेळा लाड करण्याच्या अवास्तव कल्पना किंवा इतर मुलांचे अनुकरण करण्यामुळे त्याला नुसती बिस्किटे, चॉकलेट दिली जातात. आपण घरीच पौष्टिक पदार्थ तयार तयार करू शकतो. त्यामुळे स्वच्छतेकडे आणि ताजे अन्न देण्याकडे लक्ष दिले जाते. अधूनमधून गूळ,तूप द्या. आवडते तेच खाऊ दिल्याने समतोल आहार मिळत नाही. तेंव्हा कधी कधी रागावून सर्व पदार्थ खाण्याची सवय लावा. काही मुलं कितीही खात राहतात. अन काहींना खाण्याचं भान नसतं. सारख खेळावस वाटत. अशावेळी त्यांच्या आहार गरजांनुसार वेळापत्रक ठरवावे. आणि खायला घालावं.काही वेळा मुलांना बरं वाटत नसतं अशा वेळी तो खायचं टाळतो. सक्ती न करता त्याच्या कलाने घेऊन किंवा जरा बदल करून तो उपाशी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. बाजारात,उघड्यावरचे पदार्थ देऊ नका. मुलांना काय देऊ नये याच उत्तर- ‘सर्व द्या फक्त विचारपूर्वक द्या ‘ असंच आहे.
संतुलित आहार
मुलांच्या पोषणविषयक गरजा मोठ्या प्रमाणेच असतात. किंबहुना योग्य वाढीसाठी त्यांना प्रथिने उच्च प्रतीची द्यावी लागतात. त्यासाठी अंडी, सोयाबीनचा वापर करणे हितावह ठरते. भाजणीचे थालीपीठ द्यावे.शक्य झाल्यास कणिक दुधात मळावी,भाज्या मात्र सुक्याच द्याव्यात. असे केल्याने बदल वाटतो.तेच ते खाऊन मुले कंटाळत नाहीत. मोड आलेल्या कडधान्यांचा वापरही करावा.
- मिश्र कडधान्ये, गूळ आणि शेंगदाणे यांचा आहारात समावेश करावा.
- शक्य झाल्यास मुलांना रोज दोन फळे तरी द्यावेत. वेगवेगळ्या चवी विकसित होण्यास मदत होते. फळे नसल्यास काकडी, टोमॅटो ,गाजर दयावे.कच्चे अन्नघटक खाण्याची सवय लागते. मुलांचे जेवण बनविताना शक्यतो तृणधान्ये व कडधान्ये यांचा एकत्रित वापर करावा. याला पालेभाज्या,फळभाज्या,दूध,दही यांची जोड द्यावी.
मुलांना जेवण देताना काही छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.
- खाण्यासाठी प्रेमाने समजवावे,सक्ती किंवा शिक्षा करू नये. त्याचे विपरीत परिणाम होतात.
- मुलांना बऱ्याच चांगल्या सवयी जेवणाबरोबर लावता येतात. त्या लावण्याचा प्रयत्न करावा.
- खाताना वातावरण आनंदी असावे,परिसर स्वच्छ असावा.
- जेवणाच्या पौष्टिकतेकडे आवर्जून लक्ष द्यावे.
बाळाच्या आहारातील विविधता
- बाळ खात नाही किंवा बाळाला आवडत नाही म्हणून अनेक वेळा बाळाच्या आहारात भट, भाकरी, केळी,बटाटे यासारख्या अन्नपदार्थाचा सारखा वापर करतात. वाटाणे, वाल,डाळी,हिरव्या पालेभाज्या आणि फळे यांचा वापराचं करीत नाहीत. तसेच मेदयुक्त किंवा तेलबियांचा वापरही बाळाच्या आहारात पुरेसा करीत नाहीत. बाळाला आवडत नाही किंवा बाळ खात नाही या कारणासाठी आवश्यक असलेले अनेक अन्नपदार्थ बाळाला देण्यात येत नाहीत. त्यामुळे बाळाची वाढ आणि विकास तर होतच नाहीच,शिवाय बाळ आजारी पडते.
- खरं तर बाळाच्या अन्नविषयक गरजा अधिक असतात. त्या तुलनेत बाळाला सकस आहार मिळत नसल्यामुळे बाळाचे कुपोषण होण्याची शक्यता अधिक असते.
- आपल्या बाळाचा आहार आणि पोषण योग्य प्रकारे होते कि नाही हे तपासण्यासाठी बाळाचे दर महिन्याला वजन करावे. सदृढ मुलाच्या वजनात नियमित प्रमाणात वाढ होत असते.
- एक वर्षावरील बाळ कुपोषित आहे कि नाही हे तपासण्यासाठी त्याच्या दंडाच्या मध्यभागी घेर मोजावा. हा घेर १३ किँवा १२ सेमी पेक्षा कमी भरला तर बाळाला योग्य प्रकारे सकस आहार मिळत नाही असे समजावे.
- हिरवी केळी,रताळी , बटाटे यासारखे पिठूळ आणि भरपूर पाणी असलेले पदार्थ खाण्यामुळे बाळाचे पोट भरत असेल तरीही बाळ उपाशी राहिल्यातच जमा असते कारण त्याला आवश्यक आहार मिळत नाही.
- बाळाला दिवसातून किमान तीन वेळा जेवायला द्यावे. तसेच दोन जेवणाच्या दरम्यान त्याला काही तरी खायला द्यावे.
पुरेशा सकस आहारासाठी
अनेक पालक आपल्या बाळाला योग्य प्रकारे आहार देण्याऐवजी त्याला चॉकलेट, गोळ्या ,बिस्कीट , पेय अशा वस्तू घेऊन देण्यासाठी खर्च करतात.
आहारातील घटक व त्यांचे कार्य काय असते.
- आहारात कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, क्षार आणि पाणी हे सहा घटक असतात.
- कर्बोदके शरीराला ऊर्जा/ शक्ती मिळते.
- स्निग्ध पदार्थामुळे ऊर्जा मिळते आणि नाजूक इंद्रियांचे धक्यापासून रक्षण होते.
- प्रथिनांमुळे शरीराची जडणघडण होते. प्रथिने म्हणजे जणू शरीररूपी इमारतीतील विटाच.
- जीवनसत्व प्रमाण कमी व जास्त झाल्यास वेगवेगळे रोग होतात.
- शरीरात अनेक क्षार असतात. पेशींच्या कार्यात त्याचा महत्वाचा वाटा असतो.
- पाणी हे जीवन आहे.शरीरात जवळपास ६६ टक्के पाणी असते. पाण्यावाचून माणूस जिवंत राहू शकत नाही.
मूल सशक्त होण्यासाठी उपाय
- खसखस रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी बारीक वाटावी. ती गाईच्या दुधात खडीसाखर घालून काढवावी. दररोज सकाळी मुलास पचेल तेवढे दूध तीन चार आठवडे पाजावे.
- आस्कंदाचे( अश्वगंधाचे )चूर्ण गाईच्या दुधात उकळून सकाळ संध्याकाळ पंधरा दिवस द्यावे.
- उकडलेल्या कांद्याबरोबर गूळ पंधरा दिवस सकाळ संध्याकाळ खाण्यास द्यावा.
बाळ आजारी असताना द्यावयाचा आहार
ताप आल्यावर
- भरपूर पाणी, दूध,फळांचे रस इतर रोजचा आहार देण्यास काहीच हरकत नाही. तळलेले पदार्थ देऊ नयेत.
उलट्या होत असताना
- भरपूर पाणी,सरबते,जलसंजीवनी, फळांचं रस, सूप,शहाळे इ. द्यावे. ग्लुकोज साखर द्यावी.
हगवण लागल्यावर
- साबुदाण्याचे पाणी व दूध घालून केलेली खीर द्यावी. दूध वर्ज्य सांगितले तर साबुदाण्याची खीर पाण्यातच बनवावी.
- ताज्या दह्याचे ताक, फळांचा रस, सूप,सरबत,भाताची पेज, वरणाचे पाणी, भाज्यांचे रस इ.द्यावे. भरपूर पाणी द्यावे.
कावीळ झाल्यावर
- तेलकट व तळलेले पदार्थ देऊ नयेत.
- बाकीचा समतोल आहार द्यावा.
- थोड्याशा प्रमाणात आहारातून तेल तूप दिल्यास हरकत नाही, पण प्रमाण कमीच असावं.
- अन्न वर्ज्य करू नये.
कुपोषण झाल्यावर
- प्रथिने व ऊर्जा पुरवणार आहार द्यावा.
- ज्या घटकांचा अभाव आहे, त्यांचा समावेश होईल, असे अन्नपदार्थ निवडावेत.
- तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहार ठरवावा. फळे, हिरव्या पालेभाज्या,खारीक, पेंडखजूर,काळ्या मनुका,बदाम,अंडी, दूध पोळीभाजी व वरणभात सर्व द्यावं.
बद्ध कोष्टता झाल्यावर
- मोसंबीचा रस द्यावा.
- इतर फळांचे रस, पालेभाज्या रस द्यावा.
- भिजवलेल्या काळ्या मनुका द्याव्यात.
- प्रथिनांचे प्रमाण कमी करावं.
- त्रास जास्त असेल तर गरम पाण्यात २ थेंब एरंडेल तेल द्यावं.
- भरपूर पाणी पाजावं.
हे पण वाचा-सुंदर मराठी सुविचार
हे पण वाचा-क्रिकेट खेळाविषयी अधिक माहिती