
A Spy Bahirji Naik| गुप्तहेर बहिर्जी नाईक
मूळ बहुरूपी असलेले आणि नक्कल करणे व वेष बदलण्यात पारंगत असलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.
बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत आदी कुठलेही वेषांतर करण्यात पटाईत होते. पण फक्त वेषांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्यांच्या तोंडातून शब्द चोरण्याचे चातुर्य त्यांच्याकडे होते. ते विजापूरचा आदिलशहा व दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेषांतर करून जात व खुद्द आदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत, यातच बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसून येते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांचे नेतृत्व नाईकांकडे होते. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटक,पुणे इत्यादी शहरात अगदी हुशारीने पसरवले होते. चुकीची माहिती देणाऱ्यास कडेलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फक्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे,वाऱ्यांचे आवाज असत. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेला जाणार आहेत हे सर्वात नाईकांना माहित असायचे त्या ठिकाणांची खडानखडा माहिती नाईक काढत व शिवाजी महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवीत. असं म्हटले जाते कि, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेषांतर करून आलेले असले तर ते फक्त महाराजच ओळखायचे. थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहीच, अशी सर्वांची समजूत असायची.
बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेर च नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत , दांडपट्यात ते माहीर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगानं सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करीत. शत्रूचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफवा पसरवायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फक्त शत्रूच्या प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पूर्ण माहिती ते ठेवत.

शिवाजी राजे व संभाजी राजे जेंव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्त हेर दाखल झाले होते कारण महाराजांना काही दगा फटका होऊ नये ह्याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपऱ्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले.
शिवाजी महाराजांच्या आयष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजलखानचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका,शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा किंवा सुरतेची लूट अशा प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रूची इत्यंभूत माहिती महाराजांना दिली होती. महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्ल्यांचा विचार करून पाऊल टाकत. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती, त्यावेळी गुप्तहेर खाते तयार करण्यात आले होते. तेंव्हा देखील नाईक या खात्याचे प्रमुख होते.
सुरतेची लूट चालू असताना जॉर्ज ओगेझेन्डेने हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विणवणी करावयास गेला. तेंव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वखारी समोरच्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले. त्याने इस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूद केले. इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये अश्या रीतीने बहिर्जी नाईक बद्दल उल्लेख आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्य व्यवस्था निर्माण केली. शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील गुप्तहेर खात्याला मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय निःसंशय बहिर्जी नाईक यांच्याकडे जाते.कुशाग्र बुद्धिमत्ता, समयसूचकता याना साहसाची जोड देऊन बहिर्जी नाईक यांनी शिव काळात अचाट कामगिरी बजावली आहे.
शिवरायांनी अफजलखानावर जो विजय मिळवला त्याला इतिहासात तोड नाही. पण याच वेळी बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याचे कार्य देखील अत्यंत महत्वाचे होते. अफजलखान पंढरपुरात दाखल झाल्यावर बहिर्जी यांनी खानाच्या गोटाची इथंभूत माहिती काढली. खानाचे सैन्य किती आहे, त्यात पायदळ, घोडदळ, हत्ती, तोफा- दारुगोळा किती आहे, त्याच्या जवळचे लोक कोण इथपासून ते खानाची दिनचर्या, त्याच्या सवयी इ. विषयी खात्रीशीर माहिती बहिर्जींनी राजांपर्यंत पोहोचवली.
इतकेच नव्हे तर खानचा हेतू राजांस जीवे मारण्याचा आहे असा निसंदिग्ध अहवाल बहिर्जी यांनी दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली व्यूहरचना पूर्णपणे बदलली. शिवाजी घाबरला आणि आता युद्ध होत नाही, अशी वावडी उठवून खानाचे सैन्य बेसावध ठेवण्याचे काम बहिर्जी यांच्या हेरखात्याने केले. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी देखील ‘खाना’ ने चिलखत घातले नसल्याची आणि सय्यद बंडा धोकादायक असल्याची माहिती बहिर्जींनी पोहोचवली.शाहिस्तेखानाच्या सैन्यात घुसून संपूर्ण माहिती अचूकपणे काढण्याचे काम बहिर्जी यांनी केले. उदा. रात्री पहारे सुस्त असतात इथपासून ते खान कुठे झोपतो, भटारखान्यापासून जणान खाण्यात जाणारा रस्ता कच्च्या विटांनी बंद केला आहे हाच रस्ता महाराजांनी खानापर्यंत पोहोचवण्यास वापरला पण तो बंद आहे हे ऐनवेळी समजले असते तर योजना फसली असती. रात्री पहारे सुस्तावलेले असतात इत्यादि तपशीलवार माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी खानावर हल्ला करायची योजना आखली आणि यशस्वी केली.

कारतलब खानाच्या सुमारे २०,००० सैन्यच्या महाराजांनी नुसता धुव्वा उडवला आणि त्याला बिनशर्त शरणागती घेण्यास भाग पडले. खान कोकणात जाण्यासाठी पुण्याहून निघाल्यापासून बहिर्जी आणि त्याचे हेर खानाच्या सैन्याच्या आजूबाजूला राहून माहिती काढत होते. खान बोरघाटमार्गाने कोकणात जाईल असा अंदाज होता,पण खानाने ऐनवेळी उंबरखिडीचा मार्ग निवडला.राजांना हि माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपले सैन्य आधीच उंबरखिंडीत आणि आसपासच्या जंगलात पेरून ठेवले.खानाचे सैन्य खिंडीच्या मध्यावर येताच आघाडी आणि पिछाडीची नाकाबंदी करून खानाचा पूर्ण पराभव केला. बहिर्जी यांनी दिलेल्या अचूक आणि योग्य वेळी दिलेल्या माहितीचा यात निश्चितच मोठा वाटा होता.
सुरतची मोहीम महाराजांच्या इतर मोहिमेपेक्षा वेगळी अशासाठी ठरते कि महाराजांच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतील परमुलखात काढलेली हि पहिलीच मोहीम होती. आधीच्या सर्व प्रसंगात शत्रू स्वराज्यात आला होता. त्यामुळे मोहिमेची व्यवस्थित आखणी होणे आणि राजगडापासून सुमारे १५० कोस दूर असलेल्या सुरतेची संपूर्ण माहिती मिळणे आवश्यक होते. सुरत हे मोगलांचे एक मोठे व्यापारी ठाणे होते.म्हणूनच या लुटीची योजना ३-४ महिने आधीपासून सुरु होती. या योजनेचा एक भाग म्हणून बहिर्जी सुरतेत दाखल झाले. बहिर्जी नाईक भिकाऱ्याच्या वेषात सुरतभर फिरत होते. या फिरस्तीत सुरतेच्या सरंक्षण सज्जतेबरोबरच,संपत्तीच्या ठावठिकाणची अचूक माहिती बहिर्जी यांनी संकलित केली. त्यामुळे सुरतेच्या वेशीवरून शिवाजी महाराजांनी इनायातखानास जे निर्वाणीचे पत्र दिले त्यात हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा, हाजी कासीम इ.धनिकांची नावेच दिली. इतक्या दूरवरून आलेल्या शिवाजीस आपली नावेदेखील माहित आहेत हे जेंव्हा या लोकांस कळले तेंव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. शिवाजी महाराजांनी या लुटी दरम्यान दानशूर व्यक्ती,मिशनरी याना उपद्रव केला नाही, केवळ उन्मत्त धनिक लुटले आणि केवळ तीन दिवसात सुरत मोहीम यशस्वी केली त्यात बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर यंत्रणेचा मोठा वाटा आहे.
आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि रोमहर्षक प्रसंग मानला जातो. औरंगजेबासारख्या क्रूर शत्रूंच्या हातून सुटका करून घेऊन सुमारे ७०० मैल लांब असलेल्या स्वराज्यात शिवाजीराजे सुखरूप परत आले. या प्रसंगात बहिर्जी यांच्या बुद्धिमत्तेची जोड मिळाली नसती तर इतिहास काही वेगळा झाला असता. शिवाजीस नवीन हवेलीत पाठवून तेथे त्याचा खून करण्याचा औरंगजेबाचा आदेश असल्याचे बहिर्जी यांनी कळवल्यानंतर शिवाजी महाराजांनी जलद हालचाल केली. या संपूर्ण योजनेत बहिर्जी यांचा सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होणे शक्य नव्हते. शत्रूस गुंगारा देण्यासाठी शिवाजी महाराजांनी परतीचा प्रवास उलट दिशेने सुरु केला त्यानुसार ते प्रथम मथुरेला गेले. तेथून अलाहाबाद- बुंदेलखंड-खान्देश- गोंडवन -गोवळकोंडा असा कठीण वेडावाकडा प्रवास करून ते राजगडावर येऊन पोहोचले. हा मार्ग निश्चित करताना आणि प्रत्यक्ष प्रवासात बहिर्जी यांचे हेर खाते राजांच्या अवतीभोवती असणारा आणि त्यांनी पुढचा मार्ग सुखरूप असल्याची ग्वाही दिल्यानंतर राजांचे मार्गक्रमण होत असणार हे निश्चित.
बहिर्जी आणि त्यांचे हेर स्वमुलखात आणि परमुलखात साधू, बैरागी, भिकारी,सोंगाडे,जादूगार अशा वेशात फिरत असत आणि इथंभूत माहिती घेत असत. महाराजांच्या दूरवर पसरलेल्या सैन्यात आणि गडकिल्य्यांवर माहितीची देवाण-घेवाण करणे आणि त्यात समन्वय साधने हे काम बहिर्जी नाईक यांच्या यंत्रणेने साध्य केले. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक रोमहर्षक विजयाचा पाया बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याने घातला.
इतक्या जुन्या काळात आणि तंत्रज्ञानाची साथ नसताना बहिर्जी नाईक यांच्या हेरानी माहितीचे संकलन,विश्लेषण इतक्या अचुकपणे कसे केले, भौगोलिक ज्ञान कसे मिळवले आणि ती माहीती योग्य वेळी इच्छित व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवली हे एक कोडेच आहे. इतिहास अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवतो तसाच हाही प्रश्न इतिहासाने अनुत्तरित ठेवला आहे. बहिर्जी नाईक यांनी ‘माहिती तंत्रज्ञानाची’ एक अद्ययावत यंत्रणा निर्माण केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बहिर्जी नाईक आणि त्यांची यंत्रणा हि त्या काळातील सर्व श्रेष्ठ हेर यंत्रणा होती हे निर्विवाद सिद्ध होते.
वरील सर्व बाबींचा विचार करता बहिर्जी नाईक हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते यात काही शंका नाही.
हे पण वाचा:- छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र
हे पण वाचा:- झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन चरित्र